पिंपरी : येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स वसाहतीतील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित एच. ए. शाळेत वार्षिक शुल्क थकविलेल्या काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेचे छायाचित्र पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आले. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.
सातवीतील काही विद्यार्थ्यांनी वार्षिक शुल्क भरले नव्हते. त्यामुळे वर्गशिक्षिकेने त्यांना वर्गाबाहेर उभे केले. त्याचे छायाचित्र काढून पालकांच्या ग्रुपवर शेअर केले. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करून महापालिकेकडे कारवाईची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या आदेशावरून शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली.
वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर तो विभागीय शिक्षण उपसंचालकांकड पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल. - संगीता बांगर, शिक्षणाधिकारी, महापालिका
पालकांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवरील छायाचित्र आणि मेसेजबाबत गोंधळ झाला. काही पालकांचा गैरसमज झाला होता. पालकांचे म्हणणे जाणून घेतले जाईल. मात्र, याबाबत एकाही पालकाने शाळेकडे तक्रार केलेली नाही. - दर्शना कोरके, मुख्याध्यापिका, एच. ए. शाळा
घडलेल्या प्रकाराची मला पूर्ण माहिती नाही. पालकांनीही काही सांगितले नाही. शाळेत गेल्यावर पत्रकारांकडून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे केल्याचे छायाचित्र दाखविण्यात आले. व्यक्तिगत मला या शाळेबाबत कटू अनुभव आलेला नाही. तसेच पालकांनीही याप्रकरणी आपली समस्या सांगणे गरजेचे आहे. - कपिल पाटील, उपाध्यक्ष, शिक्षक-पालक संघ, एच. ए. शाळा