पुणे : प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून कायमच दुर्लक्षित राहिलेले हिंजवडी आयटी पार्क तिथून अनेक कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने आता राजकीय नकाशावर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे भल्या पहाटेपासून भेटी देत आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे तिथे काहीच कामे होत नसल्याची तक्रार करत आहेत. या दोघांमध्ये हिंजवडी आयटी पार्कवरून राजकीय शीतयुद्ध सुरू झाले असून, त्यामुळे प्रशासनालाही धावपळ करावी लागते आहे.
अल्पावधीतच झाले नाव
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कची स्थापना १९९९ मध्ये झाली. तंत्रज्ञानाधारित उद्योग सुरू झाल्यानंतर या आयटी पार्कचा झपाट्याने विकास झाला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तिथे प्रोजेक्ट सुरू केले. आजमितीस तिथे किमान ५ लाख कामगार काम करत असावेत. आशिया खंडातील एकमेव आयटीनगरी अशी ओळख यातून तयार झाली. काही कोटी रुपयांचा महसूल इथून सरकारला मिळतो. हिंजवडी, माण, मारुंजी अशा मोठ्या परिसरात हे उद्योग, म्हणजे आयटी कंपन्यांच्या इमारती उभ्या आहेत. तिथे दररोज काही लाख कामगारांची, त्यांच्या अधिकाऱ्यांची ये-जा होत असते.
अजूनही ग्रामपंचायत
अशी ख्याती असूनही या भागात अजूनही ग्रामपंचायत आहे. ५ लाख कामगार उद्योगनगरीत नाही, तर आसपासच्या परिसरामध्ये राहतात. त्यांना दररोज कंपन्यांमध्ये ये-जा करावी लागते. एमआयडीसी जिथे कंपन्या आहेत, त्याच भागापुरते पाहते. म्हणजे तिथे रस्ते आहेत; मात्र आयटी कंपनीच्या बाहेरच्या रस्त्यांकडे कोणाचे लक्ष नाही. वीज, पाणी, सांडपाणी, मलनिस्सारण व्यवस्था अशा साध्या मूलभूत सुविधांचीही इथे वानवा आहे. नाव मोठे आणि सुधारणांच्या नावे मात्र ठणठणाट अशी इथली स्थिती आहे. याच परिसरात राहणारे कामगार, नागरिक, सोसायट्यांमधील रहिवासी या अनागोंदीला वैतागले आहेत.
उद्योगांच्या स्थलांतरानंतर जाग
दररोजच्या वाहतूककोंडीला कंटाळूनच एक-दोन नव्हे, तर तब्बल ३७ कंपन्यांनी इथून स्थलांतर केले. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सततच्या भेटी व प्रशासनावर आगपाखड त्यातूनच होते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा अधिवेशनाआधी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली. इथे काहीच विकासकामे होत नसल्याची तोफ त्यांनी डागली. हा संपूर्ण परिसर त्यांच्या, म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. उपमुख्यमंत्री अजित पवार काय किंवा खासदार सुळे काय, कोणीही या भागाकडे कधीही विकासकामे, मूलभूत सुविधा या अर्थाने लक्ष दिले नव्हते.
सातत्याने बैठका
उद्योगांचे स्थलांतर होऊ लागल्यानंतर मात्र आता सर्वांनाच जाग आली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये पवार यांनी सातत्याने या परिसराला भेट देत अधिकाऱ्यांच्या जागेवर बैठका घेण्यास, त्यांना आदेश देण्यास व त्यानिमित्ताने त्यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली आहे. खासदार सुळेही हिंजवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे म्हणून ठिकठिकाणी टीका करताना दिसतात. त्याही या भागात आता सातत्याने भेट देत आहेत. त्यांच्या या सततच्या भेटींमुळे आता कुठे प्रशासनाला जाग आली असून, ते परिसरात फिरताना, कामांचे आराखडे करताना दिसतात.
- दोन्ही नेत्यांमध्ये यामुळे राजकीय शीतयुद्ध निर्माण झालेले दिसत आहे.
फायदा व्हावा
‘त्यांना याचे काय राजकीय श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या, आम्हाला चांगले रस्ते, वीज, पाणी मिळावे’ इतकीच येथील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची, स्थानिक रहिवाशांची अपेक्षा आहे. आयटी कंपन्यांचे स्थलांतर ही बाब गंभीर आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरही याकडे गंभीरपणे पाहिले जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या आदेशानंतरच उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने या भागाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याचेही सांगितले जाते.
हिंजवडी मेट्रोचे भवितव्य
उद्योगांचे असेच स्थलांतर होत राहिले तर त्याचा परिणाम वेगाने काम होत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी या पुण्यातील तिसऱ्या क्रमाकांच्या मेट्रो मार्गावरही होण्याची शक्यता आहे. किमान ५ ते १० लाख प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा धरून एका प्रख्यात कंपनीने या मेट्रोचे काम पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड) या तत्त्वावर घेतले आहे. काही हजार कोटींचा हा मेगा प्रकल्प उद्योग स्थलांतराचा वेग वाढला तर अडचणीत येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.