साहित्य संमेलनात पिंपरी-चिंचवड दर्शन
By Admin | Updated: January 18, 2016 01:04 IST2016-01-18T01:04:02+5:302016-01-18T01:04:02+5:30
पिंपरी-चिंचवड शहराची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. उत्कृष्ट असे नियोजन असून, अतिशय सुंदर शहर आहे. इतर महापालिकांनी व नगरपालिकांनी बोध घ्यावा

साहित्य संमेलनात पिंपरी-चिंचवड दर्शन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. उत्कृष्ट असे नियोजन असून, अतिशय सुंदर शहर आहे. इतर महापालिकांनी व नगरपालिकांनी बोध घ्यावा, अशा अभिप्रायाबरोबरच या शहराचा नागरिक असल्याचा सार्थ अभिमान असणारी मते नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दालनाला भेट दिल्यानंतर नोंदविली आहे.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालनामध्ये ‘सुंदर माझे पिंपरी-चिंचवड शहर’ हे शहर विकासाचे प्रतिबिंब असणारे दालन उभारले असून, त्याला आज महापौर शकुंतला धराडे, सुनेत्रा पवार, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका शमीम पठाण, नगरसेवक प्रशांत शितोळे आदींनी भेट दिली व महापालिकेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत अभिनंदनही केले.
महापालिकेने राबविलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती असणारी चित्रफित या दालनामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच छायाचित्रांद्वारे प्रदर्शनही या दालनात उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी भेट दिली असून, महापालिकेच्या या प्रकल्पांचे कौतुक केले. स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश देणारे फलकही महापालिकेने या साहित्य संमेलनात लावले आहेत. पिंपरी-चिंचवड या नवनिर्मित पालिकेची वाटचाल अभूतपूर्व आहे. पुणे महानगराशेजारी असूनही पालिकेने घेतलेली झेप अभूतपूर्व आहे, अशा प्रकारचे अभिप्राय नागरिकांनी या दालनाला भेट दिल्यानंतर दिले आहेत. प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी प्रकल्पांची माहिती या वेळी दिली. (प्रतिनिधी)