पिंपरी : वृद्ध व्यक्तीच्या देखरेखीसाठी नियुक्त केलेल्या ‘केअरटेकर’ने घरातून दोन लाख ६३ हजार रुपये किमतीचे ८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वाकड येथील विनोदे वस्तीमध्ये शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत हा प्रकार घडला.सुनील अशोक नगरकर (४७, रा. विनोदेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आकाश महादेव बोबडे (३२, रा. जामगाव लातूर रोड चंदननगर, बार्शी, सोलापूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बोबडे हा फिर्यादी सुनील नगरकर यांच्या ७३ वर्षीय वृद्ध वडिलांच्या देखरेखीसाठी केअरटेकर म्हणून काम करीत होता. दरम्यान, आकाश याने फिर्यादी यांच्या घरातून दोन लाख ६३ हजार रुपये किमतीचे ८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून घेऊन गेला. सहायक पोलिस निरीक्षक पुनम जाधव तपास करीत आहेत.