पुणे : कोथरूड पीएमपी डेपोजवळ गेल्या पाच-सहा दिवसांपासून रोज पाच ते सहा मृत डुक्कर आढळून येत आहेत. भारतीनगर ते भिमाले टॉवरदरम्यान हे प्रकार घडत असून, या नाल्यात गुरुवारी आणखी १२ मृत डुक्कर आढळून आली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही डुकरे विषबाधेने मेली की अन्य कारणाने, हे मात्र महापालिकेला समजू शकलेले नाही. कत्तलखाण्यांमध्ये डुकरांची आरोग्य तपासणी करूनच पुढील कार्यवाही करावी, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
महापालिकेने बुधवारी मृत डुकरांची विल्हेवाट लावली असतानाच गुरुवारी आणखी १२ डुक्कर मृत आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळत असतानाच कोथरूडमध्ये डुक्कर मरून पडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मालकांचा शोध नाही :
कोथरूडमध्ये दोन ते तीन कुटुंब डुक्कर पाळतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात डुक्कर मरूनही त्यांची जबाबदारी घेण्यासाठी अद्याप कोणीही समोर आलेले नाही. तसेच महापालिकेच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
भारतीनगरमधील नाल्यात पुन्हा १२ डुक्कर मृत सापडले आहेत. आतापर्यंत सुमारे ४० डुकरांचा मृत्यू झाला आहे. पण महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी याबाबत गंभीर नाहीत. - दुष्यंत मोहोळ, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चाजे डुक्कर कत्तल खाण्यांमध्ये जातात, त्यांची व्यवस्थित आरोग्य तपासणी करावी त्यानंतरच त्यांची कत्तल करावी. अचानक मृत डुकरांची संख्या का वाढत आहे याचा सविस्तर अहवाल तयार करावा. शहरातील अन्य भागातील अधिकाऱ्यांनीही सतर्क राहावे, अशा सूचना केल्या आहेत. डुकरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यातून नेमके कारण पुढे येऊ शकते. - डॉ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका