पेट्रोलचे ‘ते’ टँकर भरवस्तीतच उभे
By Admin | Updated: October 12, 2015 01:31 IST2015-10-12T01:31:51+5:302015-10-12T01:31:51+5:30
येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ अवैध पेट्रोल, डिझेलच्या धंद्यावर धाड टाकून पेट्रोल व डिझेलचे जप्त केलेले टँकर आजही भरवस्तीत उभे आहेत

पेट्रोलचे ‘ते’ टँकर भरवस्तीतच उभे
लोणी काळभोर : येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ अवैध पेट्रोल, डिझेलच्या धंद्यावर धाड टाकून पेट्रोल व डिझेलचे जप्त केलेले टँकर आजही भरवस्तीत उभे आहेत. त्यातून गळीत होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
दि. ३ आॅक्टोबर रोजी पुरवठा विभागाने छापा टाकून चार टँकर, एक पिकअप जीपसह ४१ लाख ४१ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. नऊ जणांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले चारही टँकर सील करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. जागा उपलब्ध नसल्याने ते भरवस्तीतच उभे करण्यात आले आहेत. टँकरच्या (एमएच/ ०४/ सीए/ ५६१८) वॉल्व्हमधून पेट्रोलियम पदार्थाची गळती होत आहे. बादली व कॅन्डमध्ये हा ज्वालाग्राही पदार्र्थ जमा केला जात आहे. तो कधीही पेट घेऊ शकतो. तसे झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्याशी संपर्क साधला असता, उघड्यावर टँकर ठेवणे धोकादायक आहे. आम्ही याबाबत ६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून
टँकर सुरक्षित ठिकाणी हलवावेत किंवा त्याची विल्हेवाट लावावी. यासाठी योग्य ते आदेश व्हावेत,
असा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. (वार्ताहर)