पक्षांतर केलेल्यांना ‘स्थायी’ची बक्षिसी
By Admin | Updated: March 22, 2017 03:38 IST2017-03-22T03:38:12+5:302017-03-22T03:38:12+5:30
महापालिकेतील स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची मंगळवारी

पक्षांतर केलेल्यांना ‘स्थायी’ची बक्षिसी
पुणे : महापालिकेतील स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची मंगळवारी मुख्यसभेत महापौर मुक्ता टिळक यांनी निवड जाहीर केली. महापालिकेची सर्वांत महत्त्वाची समिती समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर पक्षाच्या ज्येष्ठ सभासदांऐवजी महापालिका निवडणुकीच्या दरम्यान पक्षांतर करून निवडून आलेल्या ४ जणांची भाजपा व राष्ट्रवादीकडून वर्णी लावण्यात आलेली आहे. स्थायी समितीच्या यादीमध्ये भाजपाकडून मुरली मोहोळ यांचे सर्वांत पहिले नाव जाहीर करून तेच अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब केले आहे.
स्थायी समितीवर एकूण १६ तर शहर सुधारणा, महिला बालकल्याण, क्रीडा व विधी समितीवर प्रत्येकी १३ सदस्यांची निवड करण्यात आली. सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्य संख्येनुसार समिती सदस्यपदाचा कोटा निश्चित करण्यात येतो. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ९८ जागा पटकावित मोठी मजल मारली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४१, काँग्रेसकडे १०, शिवसेनेकडे १० व मनसे २, एमआयएम १ असे बलाबल आहे. त्यानुसार त्यांना समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. स्थायी समितीमध्ये भाजपाच्या १० सदस्यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी १ सभासदांची स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. विविध समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी खास मुख्यसभा बोलाविण्यात आली होती. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांच्या गटनेत्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यानुसार त्यांच्या सभासदांची नावे बंद पाकिटामध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे दिली. त्यानंतर टिळक यांनी सदस्यांची निवड जाहीर केली.
महापालिकेचे ५ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनविणे, त्याची अंमलबजावणी करणे, आदी सर्व आर्थिक स्वरूपाचे अधिकार स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीवर काम करायला मिळावे, अशी बहुतांश सभासदांची इच्छा असते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर झालेल्या अनिल टिंगरे, राजेंद्र बराटे, हरिदास चरवड या तिघा सदस्यांना भाजपाकडून प्रिया गदादे यांना राष्ट्रवादीकडून स्थायी समितीची संधी देण्यात आली आहे. निवडणुकीत दिलेला शब्द यानिमित्ताने पाळला गेला चर्चा सभागृहात रंगली आहे. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, नीलिमा खाडे, कविता वैरागे आदी ज्येष्ठ सदस्यांना पक्षाकडून संधी देण्यात आली. निवडणुकीच्या वेळेस ऐनवेळी पक्षांतर करण्याचा निर्णय बदलणाऱ्या रेखा टिंगरे यांनाही राष्ट्रवादीकडून स्थायीची बक्षिसी देण्यात आली आहे.