पश्चिम घाटाच्या बैठकीला पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
By Admin | Updated: October 28, 2015 23:51 IST2015-10-28T23:51:49+5:302015-10-28T23:51:49+5:30
पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली खरी

पश्चिम घाटाच्या बैठकीला पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
घोडेगाव : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली खरी; पण खुद्द पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील साऱ्याच आमदार, खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील वगळता एकही लोकप्रतिनिधी या बैठकीला आज उपस्थित नव्हते.
पुणे जिल्ह्याच्या ९ तालुक्यांतील ३३७ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात येतात. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील आमदार-खासदारांना याविषयाची माहिती द्यावी व त्यांच्याकडून सल्ला-सूचना घ्याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आयोजित केली होती.
पश्चिम घाटाच्या संदर्भात नुकतीच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीही काही लोकप्रतिनिधींनी दिल्लीमध्ये चर्चा केलेली होती. तसेच याविषयी आता पर्यावरणतज्ज्ञांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये चांगली चर्चा होणे अपेक्षित होते. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली तरी जिल्हाधिकारी यांनी वळसे पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या वेळी वळसे पाटील यांनी पाच मुद्दे उपस्थित करून याबाबत केंद्र सरकारला कळविले जावे असे सुचवले. हे मुद्दे त्यांनी मांडले व जिल्हाधिकारी यांनी केंद्र सरकारला कळवावे असे सांगितले. या बैठकीस लोकप्रतिनिधींनी जरी पाठ फिरवली असली तरी अधिकारी मात्र उपस्थित होते. (वार्ताहर)