लोकप्रतिनिधींची गावेही स्वच्छतेसाठी उदासीन
By Admin | Updated: May 20, 2015 23:11 IST2015-05-20T23:11:54+5:302015-05-20T23:11:54+5:30
आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे

लोकप्रतिनिधींची गावेही स्वच्छतेसाठी उदासीन
इंदापूर : आतापर्यंत तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना १ कोटी ५९ लाख ७० हजार २०० रुपयांचे शौचालयाचे अनुदान दिले असतानाही येथील ३२ हजार २२७ कुटुंबांकडे अद्याप शौचालयच नसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गावांमधील स्थितीही समाधानकारक नाही. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावातील कुटुंबांची संख्या ७९६ आहे. त्यापैकी ४०० कुटुंबांना स्वच्छतागृहे नाहीत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील कुटुंब संख्या २८०९ आहे. त्या पैकी १९०२ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत.
‘स्वच्छ भारत अभियाना’च्या मंगळवारी (दि. १९ मे) मिळालेल्या आकडेवारीनुसार , तालुक्यातील एकूण ११३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत राहणाऱ्या ६० हजार ८५४ कुटुंबांपैकी २८ हजार ६२७ कुटुंबांकडे स्वच्छतागृहे आहे, तर ३२ हजार २२७ सत्तावीस कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण तालुका हगणदारीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पन्नास लाख रुपयांचे अनुदान तालुक्यास मिळाले आहे. शौचालय बांधणाऱ्या कुटुंबास बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीनशे कुटुंबांची स्वच्छतागृहांची मागणी आली आहे. आम्ही गावनिहाय प्रस्ताव एकत्र करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक महिन्याला तीन हजार या प्रमाणे शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आकडेवारीत फरक
(कंसात पंचायत समितीचा आकडा)
एकूण गावे :११३
कुटुंब संख्या : ६२३६१ (६0,८५४)
शौचालये आहेत :
३५७0९ (२८,६२७)
शौचालये नाहीत :
२६६५२ (३२,२२७)