महाराष्ट्राची जनता हीच खरी ‘मास्टरमाइंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:28+5:302021-09-21T04:12:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धायरी (पुणे) : “महाराष्ट्राची जनता हीच खरी मास्टरमाईंड आहे. घोटाळेबाज सरकारचा बुरखा फाडायचाच हे जनतेने ठरवले ...

महाराष्ट्राची जनता हीच खरी ‘मास्टरमाइंड’
लोकमत न्यूज नेटवर्क
धायरी (पुणे) : “महाराष्ट्राची जनता हीच खरी मास्टरमाईंड आहे. घोटाळेबाज सरकारचा बुरखा फाडायचाच हे जनतेने ठरवले आहे. महाराष्ट्रात आता क्रांती येत आहे,” असे म्हणत “माझी थोडी जरी चूक असती तर ठाकरे सरकारने मला अंदमान निकोबारला पाठवलं असते,” असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कोल्हापुरहून मुंबईच्या दिशेने परतत असताना नऱ्हे येथील एका कार्यकर्त्याच्या घरी सोमवारी (दि. २०) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “चंद्रकांत पाटील हे सोमय्यांचे मास्टर माईंड आहेत,” असे मुश्रीफ म्हणाले होते. त्याला सोमय्या यांनी उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार असलेले मुश्रीफ सध्या ठाकरे सरकारमध्ये मंत्री असून त्यांच्या विरोधात सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यासंदर्भात ते कोल्हापूरला जात असताना सोमय्या यांना महाराष्ट्र सरकारने सोमवारी रोखले होते.
सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा केला आहे. याबाबत तक्रार देऊनही ठाकरे सरकारने अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. किंबहुना आमच्यावरच दडपशाही करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशाने होत आहे. ठाकरे सरकारने कितीवेळाही माझ्यावर दडपशाहीचा प्रयत्न केला तरी मी मागे हटणार नाही.” आप्पासाहेब नलावडे कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. त्यात त्यांनी मुश्रीफ यांच्या जावयावरही आरोप केला आहे.
चौकट
पवार परिवाराचे घनिष्ट संबंध
“साखर कारखाना घेण्यासाठी पवार परिवाराच्या एका घनिष्ट मित्राने त्यात २३ कोटी रुपये गुंतविले आहेत. त्याबाबतचे पुरावे असून याबाबत ईडीशी चर्चा करणार आहोत. गडहिंग्लज कारखान्याची तक्रारही ईडीकडे देणार आहे,” असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.