लोहगाव परिसरातील नागरिक धास्तावले

By Admin | Updated: June 10, 2015 05:35 IST2015-06-10T05:35:52+5:302015-06-10T05:35:52+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोहगाव विमानतळाच्या परिसरातील इमारतींची माहिती संकलित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.

People in the area of ​​Lohgaon were afraid | लोहगाव परिसरातील नागरिक धास्तावले

लोहगाव परिसरातील नागरिक धास्तावले

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोहगाव विमानतळाच्या परिसरातील इमारतींची माहिती संकलित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. यात महापालिकेने परवानगी दिलेल्या बांधकामांचा आढावा सर्व प्रथम घेण्यात येणार असून, त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यात बॉम्बड्रमपासून शंभर मीटर परिसरातील सर्व बांधकामांची तपासणी करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, उच्च न्यायालयाने निकाल देताना विमानतळाजवळील सुरक्षेला आव्हान देणाऱ्या २००३ पासून उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारती वर्षभरामध्ये पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. हे आदेश देतानाच, या इमारतींमुळे यापूर्वी काढण्यात आलेल्या संरक्षण मंत्रालयाने परिसरातील बांधकामांसंदर्भात वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनांचे उल्लंघन केले आहे. असे असतानाही महापालिका आणि संबंधित शासकीय विभागांनी याठिकाणी बांधकामांना परवानगी दिल्याचा ठपका ठेवला आहे. ही बाब न्यायालयाच्या आदेशा नुसार यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनांचा अभ्यास करून, महापालिकेचे अधिकारी आणि हवाईदलाचे अधिकारी सयुक्तपणे विमानतळ परिसरातील बांधकामांची पाहणी करतील. यासोबतच या ठिकाणी महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानग्यांचाही अभ्यास करण्यात येईल. यानंतर २००३ नंतर परवानगी दिलेल्या बांधकामातील मिळकतधारकांना नोटीसेस देऊन त्यांची सुनावणी घेण्यात येईल. या सुनावणीनंतर पुढील १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असेही जगताप यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेने आत्ता पर्यंत दिलेल्या परवानग्यांची माहिती सादर करण्याचे आदेश नगर अभियंता विभागास देण्यात आले असून, त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतरच किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले आहे, हे स्पष्ट होणार असल्याचेही ते म्हणाले.
(प्रतिनिधी)

महापालिकेकडे नाही माहिती
लोहगाव परिसरातील बांधकामांबाबत न्यायालयाने महापालिकेस कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी किती बांधकामांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले, या परिसरात महापालिकेने किती बांधकामांना परवानगी दिली, अनधिकृतपणे किती बांधकामे झाली, याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे नसल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही माहिती संकलित करण्याच्या सूचना आपणही प्रशासनास दिल्या असल्याचे धनकवडे या वेळी बोलताना म्हणाले. तसेच, बांधकाम विभागाकडून नियमानुसारच परवानगी देण्यात येत असून, या ठिकाणी अनधिकृत बांधकामे असल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचे धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.

महापालिकेने बैठक घेण्याची मागणी
न्यायालयाच्या या निकालाचे वृत्त आज सकाळी समजताच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक कारवाईच्या भीतीने चांगलेच धास्तावले असून, आज दिवसभर अनेक नागरिकांनी स्थानिक नगरसेवक; तसेच महापालिकेमध्ये चौकशीसाठी ठिय्या मांडला होता, तर अनेकांकडून नगरसेवकांना मोबाईल करून माहिती विचारली जात होती.

या निर्णयामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महापालिकेने तत्काळ या परिसरातील नागरिकांची बैठक बोलावून या निकालाबाबत खुलासा करावा; तसेच कोणती बांधकामे पाडावी लागणार आहेत याची माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोहगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे यांनी केली आहे. या निकालाबाबत उलटसुलट चर्चा असून, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्तांनी तत्काळ बैठक घ्यावी, अशी मागणी टिंगरे यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सोमवारी केली.

Web Title: People in the area of ​​Lohgaon were afraid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.