‘इनरकॉन’ला थकबाकीची नोटीस

By Admin | Updated: January 8, 2015 23:05 IST2015-01-08T23:05:28+5:302015-01-08T23:05:28+5:30

मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे.

Pending notice to 'Inneron' | ‘इनरकॉन’ला थकबाकीची नोटीस

‘इनरकॉन’ला थकबाकीची नोटीस

राजगुरुनगर : पवनऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘इनरकॉन’ने खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पवनचक्कया करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे. तो वसूल करण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयाकडून कंपनीला नोटीस दिली असल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.
खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील २८ गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या मालकीच्या १९६ हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात तीस वर्षांच्या भाडे करारावर इनरकॉन कंपनीला पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. हा प्रकल्प २०१० मध्ये सुरू झाला होता.
खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात चाकण वनपरिक्षेत्रातील शिवे, वहागाव, खरपुड, कुडे आदी तेरा गावांच्या हद्दीतील राखीव वनक्षेत्रात पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या गावांच्या हद्दीत पवनचक्कयांची निर्मिती करण्यासाठी कंपनीने डोंगरांमधील मुरूम, दगड, माती यांचे अनधिकृतरीत्या उत्खनन केले होते.
वांद्रा, वेल्हावळे, वहागाव या परिसरात शासकीय आकडेवारीनुसार १० हजार ब्रास, तर कुडा परिसरात
२५ हजार ब्रास मुरूम दगड-माती
यांचे अनधिकृत उत्खनन केले होते. पवनचक्कया करण्यासाठी
कंपनीची जड वाहने जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते करण्यात आले होते. तसेच, डोंगरावर
यंत्रसामग्री नेण्यासाठी डोंगर फोडून आणि वृक्षतोड करून रस्ते तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे आणि निसर्गसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते.
(वार्ताहर)

दंडाचा आकडा वाढणार
सुमारे पस्तीस हजार ब्रास इतक्या मुरूम, माती व खडकांचे उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र इनरकॉन कंपनीने काही लाख ब्रासचे उत्खनन केलेले आहे. त्यामुळे महसूल विभागाने यंत्रांच्या साह्याने झालेल्या उत्खननाची मोजणी केली, तर दंडाचा हा आकडा प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने मोजणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Pending notice to 'Inneron'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.