नीरेत रोडरोमिओंवर दंडात्मक कारवाई
By Admin | Updated: June 25, 2016 00:37 IST2016-06-25T00:37:14+5:302016-06-25T00:37:14+5:30
पुरंदर तालुक्याच्या नीरा शहरातील रोडरोमिओंवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गुरुवारी सुमारे २२ रोडरोमिओ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले

नीरेत रोडरोमिओंवर दंडात्मक कारवाई
नीरा : पुरंदर तालुक्याच्या नीरा शहरातील रोडरोमिओंवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गुरुवारी सुमारे २२ रोडरोमिओ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले. मात्र, बेशिस्तपणे वाहतुकीच्या नियमांचा भंग करून वाहन चालविणाऱ्या १५ रोडरोमिओ दुचाकीचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
सध्या नीरा परिसरात महाविद्यालये सुरू झाल्यापासून रोडरोमिओ तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा सुळसुळाट झाला असल्याने नीरा पोलिसांनी ही कारवाई केली.
नीरा शहरातील प्रमुख मार्गावरून आणि अंतर्गत रस्त्यांवरून दुचाकीवर ट्रिपलसीट बसून कर्कश आवाजात हॉर्न वाजवत भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार घडत आहेत. अशा दुचाकीधारक तरुणांच्या टोळ्या सध्या राजरोस नीरा शहरात दिवसरात्र फिरत आहेत. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, पोलीस कर्मचारी शेगर यांनी रोडरोमिओ टोळ्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
मात्र, नीरा पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप होऊन दबाव आणण्याचा प्रकार घडत असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.