वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?
By Admin | Updated: February 23, 2017 02:29 IST2017-02-23T02:29:57+5:302017-02-23T02:29:57+5:30
पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र

वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?
बारामती : पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत ६९.८७ टक्के मतदान झाले आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये हेच मतदान ६५.६० टक्के होते. जवळपास ४.२७% मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेला टक्क्याने अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे. वाढलेला टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरविणार, हे समजण्यासाठी अवघ्या काही तासांचीच प्रतीक्षा उरली आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण २७ लाख ९२ हजार २४५ मतदार होते. यामध्ये १४ लाख ७ हजार ५० पुरुष मतदार, तर १३ लाख २२ हजार १८३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात एकूण १९ लाख ५० हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्ये एकूण २५ लाख २२ हजार ९४८ मतदार होते. त्यापैकी त्यावेळी १६ लाख ५४ हजार ९७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा जिल्ह्यात शिरुर तालुक्यात सर्वाधिक ७५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर वेल्हा तालुक्यात ७५.३० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर इंदापूर तालुक्यात ७४.८० टक्के ,तर चौथ्या क्रमांकावर मावळमध्ये ७४.१६ टक्के मतदान झाले आहे. हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत कमी ६२.६८ टक्के मतदान झाले आहे. तर मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्येदेखील हवेलीमध्ये सर्वांत कमी ५५.८५ टक्के मतदान झाले होते. तर यंदा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वेल्हा तालुक्याची त्या वेळी प्रथम क्रमांकाची सर्वाधिक ७३.८७ टक्केवारी होती. तसेच इंदापूर तालुक्यात त्या वेळी द्वितीय क्रमांकाचे ७२.८९ टक्के मतदान झाले होते. तसेच यंदा मतदानात अग्रेसर असणारा शिरुर तालुका त्या वेळी ६६.६६ टक्के मतदानामुळे तुलनेने पिछाडीवर होता. सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ जागा आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ४२, शिवसेनेचे १३,काँग्रेसचे ११, बीजेपी ३, राहुल कुल गटाचे ३, तर इतर ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.
यंदा बारामती तालुक्यामध्ये एक गट संख्या घटली आहे. तर हवेलीमध्ये एक जागा वाढली आहे. त्यामुळे सदस्य संख्या ‘जैसे थे ’आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेवरील सत्ता राखणार का, राज्यातील सत्ताधारी बीजेपी, शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण भागात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पारावरील गप्पांमध्ये सध्या केवळ या निवडणुकीचेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.