चाकण : शहरातील वाहतूककोंडीने दिवसेंदिवस उग्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडी होत असून पादचारी पुरते हैराण झाले आहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे अतिक्रमणांत वाढ होत आहे. रस्त्याने चालताही येत नसल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चाकण शहरातील जुना पुणे- नाशिक रस्त्यावरील माणिक चौक ते मार्केट यार्डपर्यंत दरम्यानच्या दुकानापुढील मोकळ्या जागेत रस्त्याच्या दुतर्फा पथारी, हातगाडी विक्रेत्यांनी अतिक्रमण करून विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. माणिक चौक, नगर परिषद परिसर, महात्मा फुले चौक, जय महाराष्ट्र चौकांत अस्ताव्यस्त, बिनदिक्कत वाहने पार्किंग केल्याने सतत वाहतूककोंडीचा सामना पादचाऱ्यांसह वाहनचालकांना करावा लागत आहे.
नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. या वाढीव रस्त्यावर सम-विषम दुचाकी पार्किंग करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र, याकडे पालिका प्रशासनासह पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सम-विषम दुचाकी पार्किंग करण्याचं बासनातच राहील आहे.
माणिक चौक ते मार्केट यार्ड दरम्यानच्या मार्गावरील अनधिकृत पथारी व्यवसायिक, टप-या,हातगाड्या अशी वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अनेकदा हटवली. मात्र ' येरे माझ्या मागल्या ' प्रमाणे पुन्हा दोन दिवसांतच रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकी वाहनांना ये-जा करण्यास एवढा अडथळा निर्माण होत नाही, परंतु या रस्त्याने बस, टेम्पो तसेच मालवाहतूक करणारी वाहने आल्यावर मोठी वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहतूकीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
२८ चाकण
चाकण शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूककोंडी.