नाशिक फाट्यावर पादचारी पूल
By Admin | Updated: January 20, 2016 01:17 IST2016-01-20T01:17:38+5:302016-01-20T01:17:38+5:30
महापालिकेकडून नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुला-जवळ पादचारी पूल (फूट ओव्हरब्रीज) उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पादचाऱ्यांची सोय होणार आहे.

नाशिक फाट्यावर पादचारी पूल
पिंपरी : महापालिकेकडून नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुला-जवळ पादचारी पूल (फूट ओव्हरब्रीज) उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पादचाऱ्यांची सोय होणार आहे.
महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग, लोहमार्ग आणि पवना नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरत असला, तरी पादचाऱ्यांची मात्र गैरसोय होत आहे. कासारवाडी रेल्वेस्थानक, नाशिक फाटा बसस्थानक या परिसरात नागरिकांची नेहमीच गर्दी असते. रेल्वेने आणि एसटीने येणारे अनेक प्रवासी नाशिक फाटा येथे उतरतात. मात्र, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडतात. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी नाशिक फाटा येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
हा पादचारी पूल उभारण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कोटी ३१ लाख रुपये निविदा खर्च अपेक्षित धरण्यात आला. या निविदा प्रक्रियेत एका ठेकेदाराने ३५.१० टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच १० कोटी ४३ लाख ९० हजार रुपयांत काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली. त्यानुसार या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने काम करून घेण्यासह त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.
या पुलामुळे कासारवाडी गावठाण, बीआरटीएस बसथांबा, रेल्वेस्थानक याकडे जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. या पुलाची एकूण लांबी अडीचशे मीटर इतकी असून, यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दुमजली पुलाप्रमाणेच या पादचारी पुलावरील विद्युत रोषणाईचा रंग ठेवण्यात येणार आहे. यामुळे नाशिक फाटा परिसर विद्युत रोषणाईने आणखीनच उजळून निघणार आहे. या पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.
तसेच देहू-आळंदी या रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड व रस्ता दुभाजकामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक कोटी २७ लाख ५६ हजार इतका खर्च करण्यात येणार आहे. या खर्चासही स्थायीने मान्यता दिली. पादचारी पुल उभारल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. यापूर्वी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. परंतु आता पादचाऱ्यांची सोय होणार आहे.(प्रतिनिधी)