कलाकारांचे प्रश्न मार्गी लावण्यास पवार अनुकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:15+5:302021-01-08T04:26:15+5:30
पुणे : “मराठी चित्रपटसृष्टीला औद्योगिक दर्जा मिळावा, कलाकारभवन उभारले जावे, वृद्ध कलाकारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी असे विषय मार्गी लावण्यासाठी ...

कलाकारांचे प्रश्न मार्गी लावण्यास पवार अनुकूल
पुणे : “मराठी चित्रपटसृष्टीला औद्योगिक दर्जा मिळावा, कलाकारभवन उभारले जावे, वृद्ध कलाकारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी असे विषय मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शवली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. प्रदेश समन्वयक संतोष साखरे, अभिनेते गिरीश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके आदी या वेळी उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीला औद्योगिक दर्जा मिळावा, यासाठी विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवार हा विषय चर्चेला घेणार आहेत. कलाकारांना हक्काचे घर देण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. ज्येष्ठ कलाकारांना सरसकट १५ हजार पेन्शन मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासही पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटील म्हणाले.
ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम, कलाकारांच्या व्हिडिओ डॉक्युमेंटरी करणे, ज्येष्ठ कलाकारांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, वृद्ध कलाकारांना उपचार मिळण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात पाच खाटा राखीव ठेवणे यासाठीही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.