पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविणार : महापौर
By Admin | Updated: March 15, 2017 03:26 IST2017-03-15T03:26:44+5:302017-03-15T03:26:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला आवश्यक असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविणार : महापौर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला आवश्यक असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे, तसेच पारदर्शक कारभारावर भर देणार असून, चुकीचा कारभार करणाऱ्यांची गय करणार नाही. समाविष्ट गावांच्या विकासावर भर देणार आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे, असे नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर काळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत विचारले असता काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याचे स्रोत शोधणे गरजेचे आहे. आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच पवना जलवाहिनीबाबतही मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा
करून हा प्रकल्प कसा राबविता
येईल. याबाबत प्रयत्न करणार
आहे.’’
प्रलंबित प्रकल्पांबाबत काळजे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांना लावलेली शास्ती रद्द करणे, शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देणे, रेडझोन, सीएमई-बोपखेल पूल प्रश्न मार्गी लागणे, आंध्रा, वडिवळे धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना आणणे, मेट्रो निगडीपर्यंत नेणे, महापौर वैद्यकीय निधी पाच हजारांऐवजी दहा हजार करणे, नदीसुधार प्रकल्प राबविणे, पर्यावरण आरोग्य, कचराविघटन विल्हेवाट, शहर हगणदरीमुक्त करणे, मोशी कचरा डेपो, चऱ्होली मैला शुद्धीकरण प्रकल्प, वायसीएममधील कारभारात सुधारणा, पीएमपीचे सक्षमीकरण, जलद बससेवा राबविणे, बीआरटी कामास चालना देणे, कत्तलखान्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, सारथी हेल्पलाइनचे सक्षमीकरण करणार आहे.’’ (प्रतितिधी)