पवनेने घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: June 13, 2015 23:47 IST2015-06-13T23:47:05+5:302015-06-13T23:47:05+5:30
पवना नदीच्या पात्रामध्ये धनेश्वर पुलाजवळ साठलेला गाळ महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे.

पवनेने घेतला मोकळा श्वास
पिंपरी : पवना नदीच्या पात्रामध्ये धनेश्वर पुलाजवळ साठलेला गाळ महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे. त्यामुळे नदीचे पात्र खोल झाले असून, अडथळे दूर झाल्याने पाण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे नदीच्या पात्राने अनेक वर्षांपासून मोकळा श्वास घेतल्याची भावना पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिराजवळ पवना नदीवर पुलाचे बांधकाम करतेवेळी पाण्याचा अडथळा टाळणे गरजेचे होते. त्या वेळी जवळच पाणी अडविण्यासाठी साकव पद्धतीचा छोटा बंधारा बांधला होता. धनेश्वर पूल बांधताना या छोट्या बंधाऱ्यामुळे पाणी हवे तसे वळवून काम करणे शक्य होत होते.
वास्तविक पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हा बंधारा काही प्रमाणात खुला करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करताच बंधारा आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आला. परिणामी, अनेक वर्षांमध्ये नदीच्या प्रवाहासोबत आलेला गाळ, दगड या बंधाऱ्याला अडत राहिला. परिणामी, धनेश्वर पुलापासून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मोरया गोसावी समाधी मंदिर, लगतचा गणपती विसर्जन घाट ते पद्मजी पेपर मिलने बांधलेल्या छोट्या बंधाऱ्यापर्यंत हा राडारोडा साचत राहिला. त्यातून नदीचे पात्र अगदीच उथळ झाले होते. गणपती विसर्जन घाटाजवळ हे पात्र २ फूटही खोल राहिले नव्हते. त्यामुळे विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती पाण्यावरच उघड्या पडत असल्याचे चित्र कित्येक दिवस दिसून येत होते. (वार्ताहर)