प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने

By Admin | Updated: June 10, 2015 05:34 IST2015-06-10T05:34:05+5:302015-06-10T05:34:05+5:30

बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात.

The passenger got 5 gold coins | प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने

प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने

पुणे : बस क्रमांक १४८... भोसरी ते पुणे स्टेशन..भोसरीमध्ये काही प्रवासी पीएमपी बसमध्ये चढतात..त्यांना पुणे स्टेशनला जायचे असते...स्थानकावर घाई-घाईत उतरताना त्यांच्याकडील एक बॅग बसमध्येच विसरते..पीएमपी वाहक ती बॅग मुख्य कार्यालयात जमा करतो.. जेव्हा बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात.

एखाद्या चित्रपटाला शोभेल ही घटना...मागील चार दिवस पीएमपी मध्ये सोन्याच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू होता. सोमवारी मालकाची खात्री पटल्यानंतर, त्याला हे सोने परत देण्यात आले. ज्ञानेश्वर जाधव असे या प्रवाशाचे नाव. ते मूळचे परभणीचे; पण लग्नकार्यासाठी पुण्यात आले होते. दि. ५ जून रोजी ते कुटुंबीयांसह भोसरीत पीएमपी बसमध्ये चढले. त्यांना पुणे स्टेशनला उतरायचे होते. स्टेशनला उतरताना त्यांच्याकडील एक बॅग बसच्या सीटवर विसरून राहते. एक बॅग बसमध्ये राहिल्याचे बसवाहक दत्तात्रय जाधव यांच्या निदर्शनास येते. ते ही बॅग पीएमपीच्या ‘लॉस्ट प्रॉपर्टी’ विभागात जमा करतात. दरम्यान, त्याचदिवशी ज्ञानेश्वर जाधव पीएमपीच्या कार्यालयात बसमध्ये बॅग हरविल्याची तक्रार करतात. मात्र, त्या वेळी विभागाकडे बॅग आलेली नव्हती. त्यामुळे त्यांना बॅग सापडली नसल्याचे सांगण्यात येते.
याविषयी पीएमपीचे महाव्यवस्थापक राजेंद्र मदने यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला पीएमपीतील कर्मचारी व अधिकारी ती बॅग उघडतात. त्यामध्ये त्यांना सोन्याचे दागिने आढळून येतात. त्यानंतर मग या सोन्याच्या मालकाचा शोध सुरू होतो. आदल्या दिवशी कार्यालयात बॅग हरविल्याबाबत तक्रार असल्याचे दूरध्वनी आला होता. त्यानुसार त्या मोबाईल क्रमांकची शोधाशोध सुरू होते. तो क्रमांक ट्रॅप केल्यानंतर संबंधितांना कर्मचारी दूरध्वनी करतात. त्यांच्याकडे बॅगबाबत विचारणा
केली जाते.
ज्ञानेश्वर जाधव यांना दि. ७ जूनला कार्यालयात बोलविण्यात येते. त्यांच्याकडून बॅगमध्ये असलेल्या वस्तूंची माहिती घेण्यात येते. सोन्याबाबतही विचारपूस केली जाते. दागिन्यांची खात्री पटण्यासाठी त्यांना खरेदीची पावती मागण्यात आली. तसेच, परभणीतील त्यांच्या सराफाकडेही दागिन्यांबाबत खात्री केली जाते. सोमवारी हे दागिने जाधव यांचेच असल्याची खात्री पीएमपी अधिकाऱ्यांना पटते. त्यानंतर जाधव यांना हे परत करण्यात आले.
(प्रतिनिधी)

Web Title: The passenger got 5 gold coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.