पक्षांच्या अपक्षांची बंडखोरी की माघारी?
By Admin | Updated: February 13, 2017 02:06 IST2017-02-13T02:06:35+5:302017-02-13T02:06:35+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि.१३) अखेरचा दिवस आहे. उमेदवारी न मिळाल्याने

पक्षांच्या अपक्षांची बंडखोरी की माघारी?
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि.१३) अखेरचा दिवस आहे. उमेदवारी न मिळाल्याने जवळपास सर्वच तालुक्यांत अनेक दिग्गजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. काहींनी तर उघड बंड केले आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी आज दिवसभर शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी ५२९ तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी ९०५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात अपक्षांची संख्याही खूप मोठी आहे. हे सर्व अपक्ष उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन रिंगणात उतरले आहेत.
यावेळी सर्वच पक्षांनी पक्षातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती दिले. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने थेट बंड करीत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळविण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे पक्षाने तिकीट न दिल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. हे अपक्ष पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांची उमेदवारी मागे घेणे हे मोठे आव्हान सर्वच पक्षासंमोर आहे. त्यात राष्ट्रवादीसमोर अनेक ठिकाणी मोठा पेच आहे. (प्रतिनिधी)