पक्षांच्या अपक्षांची बंडखोरी की माघारी?
By Admin | Updated: February 13, 2017 01:34 IST2017-02-13T01:34:14+5:302017-02-13T01:34:14+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि.१३) अखेरचा दिवस आहे.

पक्षांच्या अपक्षांची बंडखोरी की माघारी?
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी (दि.१३) अखेरचा दिवस आहे. उमेदवारी न मिळाल्याने जवळपास सर्वच तालुक्यांत अनेक दिग्गजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. काहींनी तर उघड बंड केले आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी आज दिवसभर शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी ५२९ तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी ९०५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात अपक्षांची संख्याही खूप मोठी आहे. हे सर्व अपक्ष उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन रिंगणात उतरले आहेत.
यावेळी सर्वच पक्षांनी पक्षातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती दिले. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने थेट बंड करीत दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळविण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे पक्षाने तिकीट न दिल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. हे अपक्ष पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांची उमेदवारी मागे घेणे हे मोठे आव्हान सर्वच पक्षासंमोर आहे. त्यात राष्ट्रवादीसमोर अनेक ठिकाणी मोठा पेच आहे. आज अपक्ष काय भूमिका घेताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सर्वात जास्त अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांची माघारी झाली नाही तर पक्षाला जिल्ह्यात चार पाच ठिकाणी मोठा फटका बसू शकतो. या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने एबी फार्म थेट दिल्याने बहुतांश ठिकाणी उमेदवारी राहिली नाही. आमच्या त्यांच्याशी चर्चा सुरू असून जवळपास सर्वच ठिकाणचे नाराज पक्षाच्या विरोधातील आपली उमेदवारी मागे घेतली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आमच्याकडे हा तसा काही मोठा प्रश्न नाही. जे काही आहेत, त्यांची माघारी अद्यापर्यंत होऊ शकते तर भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी ८ ते १० जण नाराज आहेत.
मात्र उद्यापर्यंत ते माघार घेतील, असा विश्वास ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचा मोबाईल शेवटपर्यंत नॉट रिचेबल होता.
माजी अध्यक्षांच्या बंडखोरीचे आव्हान
बारामती व पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे व मुलाला उमेदवारी नाकारल्याने विजय कोलते या दोन माजी अध्यक्षांचा समावेश आहे. या दोघांची मनधरणी करण्यात पक्षाला यश येते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खोमणे यांनी वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातून पक्षाने आयात उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोमणे यांची उमेदवारी कायम राहणार का, हे माघारीच्या दिवशी कळेल, मात्र त्यांनी एका पत्रकाद्वारेच उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर याच गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पुरंदरमधील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व पवार साहेबांचे विश्वासू विजय कोलते यांच्या मुलाला राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने कोलतेंच्या मुलाने उघड बंड केले आहे. गावातील शिवसेनेच्या उमेदवाराला उघड पाठिंबा जाहीर करीत जागा दाखवून देणार, असा इशारा दिला आहे.