पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

By Admin | Updated: January 11, 2015 00:50 IST2015-01-11T00:50:13+5:302015-01-11T00:50:13+5:30

देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे.

The parties require qualitative changes | पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

पुणे : देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. त्यासाठी सर्व पक्षांसह राजकारणात गुणात्मक बदल आवश्यक आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांनी सर्व भेद बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विकासाचे राजकारण केल्यास हे परिवर्तन निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार रेणुका चौधरी, खासदार किरण खेर, माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, केंद्रीय युवक कल्याण विभागाचे सचिव राजीव गुप्ता, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, प्रियदर्शनी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष नानिक रुपाणी, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे संस्थापक निमंत्रक राहुल कराड, डॉ. मंगशे कराड विद्यार्थी प्रतिनिधी सानिध्य बाली व ख्याती राजा व्यासपीठावर उपस्थित होते. चौधरी व खेर यांना या प्रसंगी अनुक्रमे गार्गी पुरस्कार व मैत्रेयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गडकरी म्हणाले, की आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसते; पण देशाची ध्येयधोरणे ठरविण्यात त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. राजकारण्यांची वागणूक, गैरव्यवहार यांमुळे समाजाचा विश्वास कमी झाला आहे. यात समाजाचा दोष नाही. देशात अनेक समस्या आहेत. त्यांना संधी मानून तरुणांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
भारतात आता पाण्याचा मोठा व्यापार झाला आहे. चांगले राजकारण करायचे असेल, तर पर्यावरणाला महत्त्व द्यायला हवे, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

४छात्र संसदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी अनेक जण घराकडे दुर्लक्ष करतात. व्यवसायात अपयश आले म्हणून राजकारणात येतात. मात्र, जे लोक स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत, त्यांना देश कसा सांभाळता येईल? त्यामुळे तरुणांनी आधी स्वत:ला ओळखावे. आपली जबाबदारी ओळखून राजकारणात प्रवेश करावा.’’

४महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नाही. तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे. त्यामुळे महिलांना वगळून देशाचा विकास होऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाल्या.

Web Title: The parties require qualitative changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.