मुळशीत उमेदवारी ठरविताना पक्षांची दमछाक
By Admin | Updated: February 4, 2017 03:59 IST2017-02-04T03:59:18+5:302017-02-04T03:59:18+5:30
मुळशी पंचायत समितीच्या ६ गण व ३ गटांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले सर्व जागांवरचे उमेदवार निश्चित केले असल्याचे तालुकाध्यक्ष गंगाराम

मुळशीत उमेदवारी ठरविताना पक्षांची दमछाक
पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ गण व ३ गटांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले सर्व जागांवरचे उमेदवार निश्चित केले असल्याचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले. दरम्यान, माण-हिंजवडी या सर्वसाधारण गटातून शिवाजी बुचडे यांची उमेदवारी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जाहीर केली आहे.
अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी आज (दि. ३) काँग्रेसकडून गणासाठीच्या ३ व गटासाठीच्या एका उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज निवडणूक कक्षात दाखलही केले असून एबी फॉर्म दाखल करण्याचे बाकी ठेवले आहेत.
माण हिंजवडी -
गट राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी
या वेळी माण-हिंजवडी हा एकमेव गट खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला असून येथून राष्ट्रवादीकडून विद्यमान जि. प. सदस्या स्वाती हुलावळे यांचे पती सुरेश हुलावळे व विद्यमान उपसभापती सारिका मांडेकर यांचे पती व राष्ट्रवादीचे माजी मुळशी तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर दोघे जण प्रबळ दावेदार आहेत. गेली अनेक वर्षे दोघेही राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान व तितकेच अनुभवी कार्यकर्ते असल्याने दोघांपैकी पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब चांदेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
काँग्रेस पक्षाने तालुक्यातील अन्य जागांचे उमेदवार निश्चित करण्याबरोबरच या गटासाठी शिवाजी बुचुडे यांची उमेदवारी बरीच अगोदर जाहीर केल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. याच गटातील माण गणातून काँग्रेसकडून सुरेश पारखी यांचेही नाव निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. जि. प.साठी सेनेकडून मच्छिंद्र ओझरकर इच्छुक आहेत. त्याशिवाय माण गणातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे स्वत: रिंगणात उतरले आहेत.
कासार आंबोली गणात उमेदवारीसाठी चुरस
कासार-आंबोली हा खुल्या वर्गासाठी राखीव गण असल्याने या गणात भाजपाकडून ४ व शिवसेनेकडून सुरुवातीपासून २१ जणांनी इच्छा व्यक्त केली असून अंतिम टप्प्यात ११ जण आपल्यालाच उमेदवारी मिळायला हवी, याकरिता प्रयत्नात आहेत. यातील काही जण तर आपल्याला संधी न मिळाल्यास बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत. त्यामुळे मूळशीत शिवसेना पक्षाच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत असणारी ही बंडाळी शमविण्यात जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना अपयश येत असल्याने थेट मातोश्रीवरून दूत पाठविण्याची वेळ कासार आंबोली गणाने आणली आहे. या गणात सर्वांना शांत करून कोणा एकाला उमेदवारी देऊन त्याचा प्रचार अन्य सर्वांनी करावा, याकरिता समन्वय बैठका घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.
राष्ट्रवादीकडून कोणाला कोळवण खोऱ्याला संधी मिळणार का, गणाच्या पश्चिम पट्ट्याला संधी दिली जाणार, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. भाजपाकडून जुने विरुद्ध पक्षात नव्याने आलेले उमेदवार या मुद्याच्या आधारे उमेदवारीसाठी चुरस आहे. विशेष म्हणजे या गणातील एकट्या शिंदेवाडीतून शिंदे आडनावाचे ४ व अन्य गावांतून १ असे पाच उमेदवार चार पक्षाकडून इच्छुक आहेत. (वार्ताहर)