पारव्यांच्या जीवाला गैरसमजांमुळे फास
By Admin | Updated: February 24, 2015 01:27 IST2015-02-24T01:27:56+5:302015-02-24T01:27:56+5:30
शांतिदूत समजल्या जाणाऱ्या पारवा या पक्ष्याबाबतच्या समज-गैरसमजामुळे त्यांची घरटी उद्ध्वस्त केले जाण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड

पारव्यांच्या जीवाला गैरसमजांमुळे फास
अंकुश जगताप, पिंपरी
शांतिदूत समजल्या जाणाऱ्या पारवा या पक्ष्याबाबतच्या समज-गैरसमजामुळे त्यांची घरटी उद्ध्वस्त केले जाण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच, पारव्यामध्ये दमा हा आजार कमी करण्याचे गुणधर्म असल्याच्या वावड्यांमुळे लगतच्या ग्रामीण भागात त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पारव्यांच्या जतनासाठी हे प्रकार रोखण्याची गरज पक्षिप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
शहरामध्ये सध्या कासारवाडी येथे पारव्यांचे सर्वाधिक थवे दिसून येतात. याचबरोबर सांगवी, भोसरी, निगडी, प्राधिकरण, चिंचवड, पिंपरीसह शहरभरातील इमारतींवर घरटी करून राहणाऱ्या पारव्यांचे प्रमाण विखुरलेले आहे. मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत असल्याने बरीच वर्षे या पक्ष्यांची संख्या वाढत राहिली. मात्र मागील काही वर्षांमध्ये या पक्ष्यामुळे आजार पसरण्याबाबत असणाऱ्या गैरसमजांमुळे विशेषत: बड्या गृहप्रकल्पांमधील, तसेच, उच्चभ्रू वसाहतींमधील नागरिकांमधून या पक्ष्याबाबत तिटकाऱ्याची भावना वाढत असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपल्या सदनिकेच्या सज्जातील, खिडकीवरील सिमेंटच्या झरोक्यावर तसेच, छतावरील एखाद्या कोपऱ्यात पारव्याचे घरटे दिसल्यास ते काढून टाकण्याचा सपाटाच लावला जात आहे. काही घरट्यांमध्ये अंडी अथवा पिले दिसल्यावरही ती एखाद्या कामगाराकरवी काढून टाकण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शहरात शांतिदूताचे जगणेच अशांत झाले आहे.
दुसरीकडे पारव्यामध्ये दमा कमी करण्याचे औषधी गुणधर्म असल्याच्या वावड्या काही जणांकडून उठविल्या जात आहेत. त्यांच्याकडूनच पारव्यांची शिकार करून औषध लोकांना विकण्याचे प्रकार सुरू आहेत. काहीजण पारव्याचीच शिकार करून आहारासाठी वापर करीत आहेत. शहरालगतच्या मोशी, चिखली, किवळे, पुनावळे, हिंजवडी,
चांदखेड या परिसरात शेतामध्ये चारा खाण्यास उतरणाऱ्या पारव्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे.