कोरेगाव भीमातील पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद
By Admin | Updated: February 15, 2017 01:18 IST2017-02-15T01:18:40+5:302017-02-15T01:18:40+5:30
बिबट्याने मागील महिन्यात कोरेगाव भीमा परिसरात एका तरुणाचा पाठलाग केला होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये

कोरेगाव भीमातील पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद
कोरेगाव भीमा : बिबट्याने मागील महिन्यात कोरेगाव भीमा परिसरात एका तरुणाचा पाठलाग केला होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, नुकताच शुक्रवारी दुपारी बिबट्या आपल्या बछड्यासह फें्रड्स शाळेजवळ शाळकरी मुलांना दिसला. त्यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावण्याच्या पलीकडे कोणतीच खबरदारी अद्याप घेतलेली नाही.
कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, आपटी, डिंग्रजवाडी परिसरात दोन महिन्यांपासून नर-मादी बिबट्या व दोन पिले नागरिकांना सतत निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे डिंग्रजवाडी येथील एकनाथ हरगुडे यांच्या गोठ्यातील शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. शेळीला उसाच्या फडात ओढत नेत असताना नागरिक पाहत होते, तरीही काहीच करू शकले नाहीत. कुत्रीही मारली तसेच त्याच दिवशी पहाटे कोरेगाव भीमाच्या पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्या शेतात बसलेल्या धनगराच्या वाड्यातील घोडीचा फडशा पाडला व दोन कुत्र्यांचा फडशा पाडून पळवून नेले.
३१ जानेवारी रोजी विश्वास गव्हाणे हा तरुण शेतात काम करीत असताना बिबट्याने त्याचा पाठलाग केल्याने त्याच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग आला होता. मात्र, गव्हाणे प्रसंगावधान राखून विजेच्या खांबावर चढला. त्यामुळे जीव वाचण्यास मदत झाली होती. शुक्रवारी (दि. १०) मादी बिबट्या आपल्या बछड्यासह थेट फ्रेंड्स शाळेच्या मागील बाजूला आल्याचे विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.
बिबट्याने हिंस्र रूप घेतल्यास नागरिकांच्या जिवावरही बेतण्याचा प्रसंग येऊ शकत असल्याने वन विभागाने बिबट्या व पिलांना पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी दोन महिन्यांपासून करूनही ठोस कार्यवाही होत नाही.