पानशेत वसाहतीत आली वीज!
By Admin | Updated: January 6, 2015 23:01 IST2015-01-06T23:01:43+5:302015-01-06T23:01:43+5:30
वेल्हे तालुक्यातील पानशेत वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी वीजनिर्मिती बंद पाडल्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाने थकबाकी भरण्याची हमी घेतली

पानशेत वसाहतीत आली वीज!
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पानशेत वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी वीजनिर्मिती बंद पाडल्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाने थकबाकी भरण्याची हमी घेतली व गेल्या २८ नोव्हेंबरपासून बंद असलेला वसाहतीचा वीजपुरवठा सुरु झाला़
वसाहतीमधील वीजेचे थकबाकी १ कोटी ६७ लाख रुपयांवर गेल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपूर्वी महावितरणने वसाहतीचा वीजपुरवठा खंडीत केला होता़ त्यामुळे या वसाहतीला नववर्षाचे स्वागतही अंधारात करावे लागले होते़
या परिसरात पानशेत, वरसगाव, खडकवासला या धरणांवर काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालये, कर्मचारी निवासस्थाने, बँका, विद्यार्थी वसतिगृहे, शाळा, पानशेत धरणग्रस्त इत्यादींना विजेअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत होता.
लोकमतने याबाबत ‘पानशेत वसाहतीतील बत्ती गूल ’ असे वृत्त झापून ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या होत्या. या वेळी वीजपुरवठा पूर्ववत करा; अन्यथा जलसमाधी घेऊ, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही. अखेर सोमवारी येथील ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनासाठी जमा झाले व त्यांनी आंदोलनास प्रारंभ केला. यामध्ये दोन हजार महिलांचा सहभाग होता. दुपारी एक वाजता आंदोलकांनी धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाणी बंद केले. सुमारे दीड तास वीजनिर्मिती बंद पाडली. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. वीजपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य गणपत गायकवाड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस रमेश शिर्के, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान बांदल, युवक अध्यक्ष किरण राऊत, कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक भगवानराव पासलकर, पंचायत समिती सदस्य राजेश निवंगुणे, सरपंच आशा पासलकर, अंकुश पासलकर, ज्योती कडू, अरुण शिर्के, वंदना निवंगुणे, बाळासाहेब कोंडेकर, माजी सभापती निर्मला जागडे, राजेंद्र ठाकर, परिसरातील धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. वसाहतीमधील १ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. येत्या २० जानेवारीला २३ लाख रुपये भरण्याची हमी खडकवासला पाटबंधारे विभागाने दिल्याने वीजपुरवठा सुरू होणार आहे.