पनीर रोलऐवजी दिला चक्क चिकन रोल!
By Admin | Updated: September 25, 2015 01:39 IST2015-09-25T01:39:51+5:302015-09-25T01:39:51+5:30
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्यपदार्थांच्या आऊटलेटमध्ये

पनीर रोलऐवजी दिला चक्क चिकन रोल!
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्यपदार्थांच्या आऊटलेटमध्ये शाकाहारी प्रवाशांना पनीर रोल म्हणून चक्क चिकन रोल खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. ही बाब लक्षात येताच संबंधित प्रवाशाने याबाबत चालकाकडे विचारणा केली. याठिकाणी असलेले इतर पनीर रोल उघडून पाहिले असता, त्यातही चक्क चिकन असल्याचे आढळून आले. मात्र, या प्रकारानंतर संबंधित कंपनीने माफी मागत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री. शहा हे चीनला जाण्यासाठी पुण्याहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ३७९ रात्री आठ वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोहोचले. आठ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या परिसरात असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्य पदार्थाच्या आऊटलेटमध्ये त्यांनी पनीर रोलची आॅर्डर दिली. हा रोल खाल्ल्यावर त्याची चव वेगळीच असल्याचे शहा यांच्या लक्षात आले. त्यांनी रेस्टॉरंट चालकाकडे याबाबत तक्रार केली. परंतु, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सर्व पनीर रोल दाखविण्याची मागणी केल्यावर या सर्वच रोलमध्ये चक्क चिकन आढळून आले. त्यामुळे शहा यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने आपल्या नातेवाइकांना फोन वरून हा प्रकार कळविला. त्यांनी संबंधित आऊटलेटच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. त्यानंतर नातेवाइकांकडून संबंधित हॉटेल व्यवस्थापकाकडून याबाबत माफी मागण्यात आली. रोलवर लावण्यात आलेला व्हेज आणि नॉनव्हेजचे चिन्ह नजरचुकीने बदलल्याने हा प्रकार घडल्याचे संबंधित चालक सांगत असल्याचे शहा यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याबाबत डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हीएशन (डीजीसीए) कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.