एका क्लिकवर लागणार पंडितजींचा शोध
By Admin | Updated: February 2, 2016 00:53 IST2016-02-02T00:53:44+5:302016-02-02T00:53:44+5:30
कोणताही विधी, पूजा-अर्चा, मुहूर्त, इतर धार्मिक माहिती घरबसल्या ‘पंडित आॅन क्लिक’ या वेब पोर्टलवर मिळणार आहे.

एका क्लिकवर लागणार पंडितजींचा शोध
पिंपरी : कोणताही विधी, पूजा-अर्चा, मुहूर्त, इतर धार्मिक माहिती घरबसल्या ‘पंडित आॅन क्लिक’ या वेब पोर्टलवर मिळणार आहे. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज आॅफ बिझनेस मॅनेजमेंटचे विद्यार्थी विकास झा आणि हनुमंत पांडे या विद्यार्थ्यांनी हे वेब पोर्टल यशस्वीरीत्या बनविले आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘यंग इंडिया, स्टार्ट अप इंडिया’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन हे पोर्टल विकसित केले आहे.
विविध पूजा विधी करण्यासाठी वारंवार भटजी शोधण्यात हेलपाटे मारावे लागतात. त्यातही वेळेवर भेटत नाही. अशा वेळी इंटरनेटवरून तुम्ही पूजेसाठी लागणारे साहित्य, त्यासाठी द्यावी लागणारी दक्षिणा, शुभमुहूर्त, पूजेचे स्वरूप अशी सर्व माहिती एकत्रितपणे घेऊन थेट भटजीच तुमच्या घरी उपलब्ध होऊ शकणार आहे.
वेब पोर्टलचे उद्घाटन महापालिका आयुक्त राजीव जाधव झाले. या वेळी कॉलेजचे संस्थापक दीपक शहा, डॉ. प्रशांत गुंडावार, नगरसेविका सुजाता टेकवडे, नगरसेवक संजय वाबळे, विलास मडेगिरी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, ‘‘सत्यनारायण, लग्न, मुहूर्त, वास्तुशांती अशा अनेक पूजेच्या वेळी पुजारींना बोलावले जाते. यासाठी आता शोधाशोध करावी लागणार नाही. वेळेची बचत होईल.’’
कॉलेजचे संस्थापक शहा म्हणाले, ‘‘कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, योग्य प्रशिक्षण व नोकरी करण्यासाठी संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्थेच्या वतीने २५ हजाराचा धनादेश विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिला आहे. यासाठी गुरुराज डागरे यांनी सहकार्य केले आहे. ’’
साडेतीन लाख रुपये खर्च करून हे पोर्टल विद्यार्थ्यांनी बनविले आहे. नागरिकांनी मागणी केल्यास काशी येथील पुजारी देखील पूजेसाठी उपलब्ध होतील. तसेच विविध धार्मिक पुस्तकेही लवकरच या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अवघ्या दोन दिवसांत या पोर्टलला एक हजार नागरिकांनी भेट दिली आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
शहरात प्रथमच असे अनोखे पोर्टल बनविण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे. विद्यालयात शिकत असतानाच काही
तरी अनोखे करण्याची जिद्द या
तरुणांनी बाळगली होती. श्रुती शशीधरन व प्रिया भगोडिया यांनी सूत्रसंचालन
केले. (प्रतिनिधी)