पंडित सी. आर. व्यास यांना सांगीतिक मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:14+5:302021-03-15T04:11:14+5:30
पुणे : पंडित उदय भवाळकर यांची ध्रुपद गायकी... अन पंडित सुहास व्यास यांच्या सुरेल गायकीने रसिकांना श्रवणानंदाची अनुभूती मिळाली. ...

पंडित सी. आर. व्यास यांना सांगीतिक मानवंदना
पुणे : पंडित उदय भवाळकर यांची ध्रुपद गायकी... अन पंडित सुहास व्यास यांच्या सुरेल गायकीने रसिकांना श्रवणानंदाची अनुभूती मिळाली. रसिकांच्या प्रतिसादात सजलेल्या स्वरमैफलीतून पंडित सी. आर. व्यास यांना सांगीतिक मानवंदना देण्यात आली.
भारतीय अभिजात संगीत विश्वात गायक, गुरू व रचनाकार म्हणून पंडित सी. आर. व्यास यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याला सांगीतिक मानवंदना देण्यासाठी कलावर्धिनी फाउंडेशन, महाराष्ट्र ललित कला निधी आणि ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टसच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पं. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यांनी अनेक रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पखवाजावर सुखद मुंडे यांनी सुंदर साथ केली. कार्यक्रमाची सांगता पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र व गायक पं. सुहास व्यास यांच्या गायनाने झाली. त्यांनीही आपल्या सुमधुर गायकीने रसिकांची दाद मिळवली. त्यांना प्रशांत तांडव आणि अमेय बिच्छू यांनी साथसंगत केली. कोरोनापासूनची सर्व खबरदारी घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता.