आषाढीची पंढरपूर वारी ‘आयटी’त
By Admin | Updated: July 8, 2015 01:59 IST2015-07-08T01:59:00+5:302015-07-08T01:59:00+5:30
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पंढरपुरच्या वारीचा अनुभव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणींना घेता यावा यासाठी चक्क काही तंत्रज्ञांनी एकत्रित येत आॅनलाईन नोंदणीस सुरूवात केली आहे

आषाढीची पंढरपूर वारी ‘आयटी’त
पुणे : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पंढरपुरच्या वारीचा अनुभव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणींना घेता यावा यासाठी चक्क काही तंत्रज्ञांनी एकत्रित येत आॅनलाईन नोंदणीस सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसात ६०० जणांना यात आॅनलाईन नोंदणी केली आहे.
हरी नामाचा जयघोष करीत देहू व आळंदी येथून निघणारी वारी पंढरपूरकडे जाते. या परंपरेकडे आता उच्च पदावर काम करणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणी आकर्षित होत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात वारीमध्ये आयटीयन्सचा सहभाग वाढू लागला आहे. पण सहभागी होणारे बहुतांशी आयटीयन्स हे महाराष्ट्रीयन आहेत. ज्यांना वारीचे महत्व माहिती आहे.
पुणे आयटी हब म्हणून उदयास आल्यानंतर येथील कंपन्यांमध्ये महाराष्ट्राबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी येणाऱ्या तरूण-तरूणींचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र आहे. त्यांना महाराष्ट्राच्या या वैभवाची, परंपरेची माहिती द्यावी, त्यांना ती अनुभवता यावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बाहेरच्या राज्यातील आयटीयन्सला वारीत कसे सहभागी व्हावे, त्याचा इतिहास काय आहे, याची माहिती नसल्याने त्यांना सहभागी होता येत नाही. हे ओळखून त्यांच्यासाठी खास आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
याबाबत आयटी दिंडीचे राजेश पाटील म्हणाले, ‘‘गेल्या ४ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहे. पहिल्या वर्षी साधारणत: ७ ते ८ आयटीयन्सच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. अवघ्या ४ वर्षात ही संख्या ६०० पर्यंत वाढली आहे. आयटी, बीपीओ क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप ताण-तणाव सहन करावा लागत असतो. तो कमी व्हावा आणि त्यांना निळख आनंद मिळावा यासाठी वारी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यात परराज्यातील तरूण-तरूणींच्या सहभागाचे प्रमाणही मोठे आहे. (प्रतिनिधी)