पंचवटी उद्यान दत्तक...!
By Admin | Updated: January 26, 2015 01:44 IST2015-01-26T01:44:35+5:302015-01-26T01:44:35+5:30
वृक्षतोड, पक्ष्यांच्या निवाराच्या समस्या, पक्षिनिरीक्षण केंद्र व अभयारण्य ओस पडत चालली असताना पाषाण येथील वृक्षप्रेमी किसन गारगोटे व डॉ. विद्या गारगोटे

पंचवटी उद्यान दत्तक...!
बेनझीर जमादार, पुणे
वृक्षतोड, पक्ष्यांच्या निवाराच्या समस्या, पक्षिनिरीक्षण केंद्र व अभयारण्य ओस पडत चालली असताना पाषाण येथील वृक्षप्रेमी किसन गारगोटे व डॉ. विद्या गारगोटे
या दाम्पत्याने पंचवटी उद्यान दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करण्याचा एक नवा आदर्श समाजाला घालून
दिला आहे.
गारगोटे यांनी अंदाजे साठ एकर जागेत ३१५० वृक्ष लागवड करण्याचा यशस्वी प्रकल्प केला आहे. याठिकाणी त्यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सहा पाण्याची तळी, पाण्याच्या टाक्या, टाक्यांमध्ये पाणी जाण्यासाठी अंतर्गत पाइपलाईन, ठिबक सिंचन, प्रत्येक झाडांना आधार म्हणून बाबूंची काठी, पक्ष्यांसाठी महिन्याला शंभर किलो धान्य व त्यासाठी लागणाऱ्या चार मोठ्या आकाराच्या पराती, वृक्ष लागवडीसाठी व जोपासण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून घोषवाक्यासह सहा फलक बसविण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रिक पंपाच्या विजेच्या पुरवठ्याची व्यवस्था त्यांनी स्वत:च्या घरातून केली आहे. विनोद राठोड व विनायक राठोड यांची झाडांना पाणी देण्यासाठी व संरक्षणासाठी रोजंदारीने कायमस्वरूपी नेमणूकदेखील केली आहे.तसेच प्रत्येक झाडांना योग्य प्रमाणात खताचा पुरवठा करणे व डोंगरावरील झुडपे व इतर उपद्रवी झाडे छाटणे व प्रसंगी काढून टाकणे ही कामेदेखील पूर्ण करण्यात येणार आहे.
मूळचे खेडचे असणाऱ्या या दाम्पत्यांना लहानपणापासून झाडे, प्राणी, पक्षी यांची आवड आहे. त्यांनी कित्येक जंगलांची सफारीदेखील केली आहे. गेली दोन वर्षे पंचवटी भागात राहणाऱ्या या गारगोटे कुटुंबांना ही आपली आवड स्वस्थ
बसू देईनात, या विचाराने त्यांनी घरालगत असणाऱ्या पालिकेच्या पंचवटी उद्यानात पहिल्यांदा शंभर झाडे लावू का, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली. यानंतर त्यांनी हा छंद जोपासत ३१५० आकडा पार केला. नुकतेच या उद्यानाला पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, मुख्य वनरक्षक सत्यजित गुजर यांनी भेट दिली.