पानमळे, डाळिंबाला उन्हाचा तडाखा
By Admin | Updated: March 22, 2015 22:57 IST2015-03-22T22:57:28+5:302015-03-22T22:57:28+5:30
ऐन मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीनंतर सावरणाऱ्या शेतकऱ्याला आता कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. राज्यावर अचानक पुन्हा एकदा अवकाळीचे संकटही घोंगावू लागले आहे.

पानमळे, डाळिंबाला उन्हाचा तडाखा
पुणे : ऐन मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीनंतर सावरणाऱ्या शेतकऱ्याला आता कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. राज्यावर अचानक पुन्हा एकदा अवकाळीचे संकटही घोंगावू लागले आहे. विपरित हवामानाचा पिकांना फटका बसला असून यंदा शेतातून मिळणार तरी काय? याची चिंता त्याला आहे. इंदापूर तालुक्यात डाळिंब व पानमळ्यांना उन्हाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने द्राक्षमळे, डाळिंबांच्या बागा, पानमळे सुकू लागले आहेत. पशु-पक्षीही झाडांच्या सावलीचा आधार शोधू लागले आहेत. कान्हुरमेसाई परिसरात ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
निमगाव केतकी : पानवेली व माळरानावरती फुलवलेल्या डाळिंब बागा यांना वाढत्या उन्हाळ्यामुळे निमगाव केतकी परिसरात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
शेतकरी उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्यावर आयुर्वेदिक पानवेलीचे पानमळे जिकिरीने जोपासत आहेत. शेतकयांच्या परिश्रमामुळे राज्यात पानाचे निमगाव हे नाव आजही झळकत आहे. या पानाच्या अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागा लावून आर्थिक नफा मिळवण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडला आहे. परंतू सद्यस्थितीमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिकांना जास्त पाणी लागत आहे. यामुळे माळरानावर व खडकाळ जमिनीमध्ये लावलेल्या बागांना पाण्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाल्याचे चित्र सध्या परिसरामध्ये दिसू लागले आहे.
अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावाबरोबरच परिसरातील पिटकेश्वर, सराफवाडी, गोतोंडी, वरकुटे खुर्द, शेळगाव, बनकरवाडी, पळसदेव, कालठण, व्याहळी, कौठळी, माळवाडी आदी गावांमधील बहुतांश शेतकरी आयुर्वेदिक पानवेलींची शेती करतात.
पानवेलींचे मळे जोपासणे सध्याच्या काळात अतिशय जिकिरीचे झाले आहे. तरीही या भागातील शेतकरी चिकाटीने हे मळे फुलवतात. या पानवेलींच्या लागवडीपासून ते पानांचा मळा सुरू होईपर्यंत भरपूर खर्च करावा लागतो. पानवेलीची लागण करताना पानमळ्यातील वेल विकत घेऊन लावावे लागतात. एका वेलाची किंमत सात ते दहा रुपये एवढी असते. साधारणत: अर्धा एकर पानवेलीची लागण करण्यासाठी वीस ते बावीस हजार खर्च करावा लागतो. परंतु, सुरुवातीला मुबलक पाणी असलेल्या विहिरी व बोअरवेलशेजारी इतर बोअरवेल व विहिरी झाल्याने कोरडी पडतात.
४पानवेली लागवडीनंतर दहा ते अकरा महिन्यांमध्ये खुडणी सुरू होते. या पानवेलींना पंधरा ते वीस दिवसांनी बांधावे लागते. यासाठी साडेचारशे ते पाचशे रुपये रोजगार द्यावा लागतो, तर पाने खुडण्यासाठी वेगवेगळ्या पानांसाठी वेगळी मजुरी द्यावी लागते. मजुरी चारशे पानांसाठी दहा ते वीस रुपयांपर्यंत असते. यामुळे पानवेली जोपासताना होणारा खर्च जास्त असतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळाला तरच शेतकऱ्यांना फायदा होतो, अन्यथा नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
४याबरोबरच पाणीटंचाईचा फटका बसल्यास पानवेली जळून जातात. यावर्षी मार्च महिन्यामध्ये पाण्याची टंचाई सुरू झाल्याने मे महिन्यामध्ये पानमळे कसे संभाळायचे, हा गंभीर प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
४डाळिंब बागा अतिशय चांगल्या आहेत. कारण डाळिंब बागांसाठी मुरमाड जमीनच चांगली असते. या ठिकाणच्या बागांना बहर धरले आहेत. काही बागांची फळे सेटिंग झाली आहेत. परंतु, उन्हाची तीव्रता वाढल्याने या बागांना पाणी कमी पडत आहे. बागांना पाणी कमी पडत असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये पाण्याची पातळी खालावली जाणार आहे व उन्हाचा तडाका आणखी वाढणार आहे मग डाळिंबाचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कान्हुरमेसाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणारे पाण्याचे जलस्रोत व पाण्याचे साठे संपुष्टात आले असून, या वर्षी कान्हुरमेसाई भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे, नव्हे-नव्हे तर पाण्यासाठी गाव सोडण्याची वेळ कान्हुरमेसाई ग्रामस्थांवर आली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, ते विकत घेण्याची वेळ आली आहे.
गेल्या आठ ते दहा वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे.
कान्हुरमेसाई (ता.शिरुर) येथील पाण्याची पातळी खोलवर असल्याने नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन, विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भारत निर्माण वर्धित कार्यक्रमांतर्गत १ कोटी ९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करून दिला. त्यानुसार मलठण (ता.शिरुर) येथून महालेवस्ती जवळील हनुमान तलावाजवळ विंधनविहीर घेऊन कान्हुरमेसाईपर्यंत दाब नलिकेमार्फत पाणीपुरवठा करण्याचे ठरले. सुरुवातीच्या काही काळात योजनेचे पाणी आले. मात्र, आता तळ्यात व विहिरीत पाणी असत नाही. कान्हुरमेसाई ग्रामस्थांना दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागते, तर काही ग्रामस्थांना ४० रुपयाला ७० लिटर पाणी, तसेच खासगी टॅक्टरने पाणी गावात फिरून विकत असल्याचे चित्र कान्हुरमेसाई परिसरात दिसत आहे.
कान्हुरमेसाई येथील पाणी दुष्काळ योजना विस्थापित झाली असून, जवळपास ९ कि.मी. वॉटर सक्षम योजनेत १ कोटी ९ लाख ३३ हजार रुपये खर्चुन तयार करण्यात आली. मात्र, या योजनेचे काम अर्धवट असून, कामे पूर्ण झालेली नाही. तसेच भराई लावण्यातही अद्याप पाईप टाकण्यात आले नाही. काम चालू करण्याकरिता पाणी विभागाचे कॉन्ट्रॅक्टर यांना वारंवार सूचना करूनदेखील काम करू, अशी उत्तरे मिळत असल्याचे शिरूर मनसेचे उपाध्यक्ष शहाजी दळवी यांनी सांगितले. पाणी येत का नाही, म्हणून शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरंडे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना विचारले असता, त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकारही नुकताच कान्हुरमेसाईत घडला. ग्रामसेवक साळुंके यांना विचारले असता, योजनेतील ५ लाख रुपये शिल्लक असून १५ ते २० टक्के काम झाले नसल्याचे सांगितले.