पिंपळवंडीही तापाने फणफणली
By Admin | Updated: September 27, 2014 07:23 IST2014-09-27T07:23:25+5:302014-09-27T07:23:25+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० संशयित रुग्णांच्या केलेल्या तपासणीत पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत

पिंपळवंडीही तापाने फणफणली
पिंपळवंडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० संशयित रुग्णांच्या केलेल्या तपासणीत पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपळवंडी परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून थंडीताप, खोकला, हातपाय दुखण्याच्या आजारांची साथ सुरू आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ ते ३० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यांपैकी ५ रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली असून, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बाकीचे रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगावे यांनी सांगितले.
पिंपळवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाजरगवतही वाढले आहे. त्यातच या वर्षी खूप पाऊस झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. पाऊस संपल्यावर ग्रामपंचायतीने तणनाशक आणि जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे होते. परंतु, त्याबाबत कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली नाही. तसेच, पिण्याच्या पाण्यात औषधही टाकले जात नाही. ग्रामपंचायत कार्यालयाकडील धुरळणी यंत्र धूळ खात पडून आहे. यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही धुरळणी का केली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक माहिती घेण्यासाठी पिंपळवंडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जुन्नरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही आपण सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)