पालिकेला चार महिन्यांपासून सापडेना गळती
By Admin | Updated: February 2, 2015 02:23 IST2015-02-02T02:23:02+5:302015-02-02T02:23:02+5:30
भोर शहरातील पोलीस स्टेशन ते रामबाग रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यामधून गेलेल्या पाणीपुरवठा

पालिकेला चार महिन्यांपासून सापडेना गळती
भोर : भोर शहरातील पोलीस स्टेशन ते रामबाग रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यामधून गेलेल्या पाणीपुरवठा लाईनची गळती मागील चार महिन्यांपासून भोर नगरपालिकेला सापडत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ताही खोदण्यात आल्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागतात.
भोर शहरातील चौपाटी ते रामबाग या महाड-पंढरपूर रस्त्यामधून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. मात्र या पाईपलाईनला गळती लागली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही गळती सापडत नाही. गळती शोधण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र काही ठिकाणचेच खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले. मात्र चौपाटी परिसरातील पाणीपुरवठा लाईन भर रस्त्यातूनच गेल्याने मागील अनेक महिन्यांपासून ती गळत आहे. त्यामुळे सुरू झालेले काम पुन्हा बंद करण्यात आले. गळती शोधण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दररोज रस्ता उकरून नवनवीन खड्डे पडत आहेत. मात्र त्यांना पाण्याची गळती काही सापडेना. रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यात पाणी साचते. या खड्ड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा रस्ता येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (वार्ताहर)