पालखी मार्ग होणार ‘हरित मार्ग’

By Admin | Updated: July 2, 2015 23:59 IST2015-07-02T23:59:56+5:302015-07-02T23:59:56+5:30

देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर सुमारे अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हा दोनशे पंचवीस कि.मी.चा पवित्र मार्ग एक ‘हरित मार्ग’ म्हणून भविष्यात

Palkhi route will be 'Green Road' | पालखी मार्ग होणार ‘हरित मार्ग’

पालखी मार्ग होणार ‘हरित मार्ग’

आळंदी : देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर सुमारे अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, हा दोनशे पंचवीस कि.मी.चा पवित्र मार्ग एक ‘हरित मार्ग’ म्हणून भविष्यात ओळखला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आळंदीत सांगितले.
पालखी मार्गावर करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आळंदीत शुभारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, शासनस्तरावर सर्वच कामे शक्य नसल्यामुळे पुणे येथील सामाजिक संस्थेकडे वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, वृक्षलागवड करतानाच सशक्त असलेले व किमान पाच ते सहा वर्षे वाढ झालेल्या वृक्षांचीच लागवड करण्यात येणार आहेत.
सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. वारकऱ्यांचे आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेण्यामध्ये प्रशासन कुठेही कमी पडणार नसल्याचेही बापट यांनी सांगितले.
येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गोपालपुरा परिसरात यंदाचे मानकरी पांडुरंग तुकाराम वरखेडे यांच्या ‘सोन्या व हिऱ्या’या बैैलजोडीची पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर बैलजोडीची मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. नदीघाटावरील भाजीमंडई परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी माऊलींचे दर्शन घेतले.
त्यांच्यासमवेत पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, ज्ञानेश्वर शिक्षणसंस्थेचे सुरेश वडगावकर, विलास कुऱ्हाडे, भाजपाचे संजय घुंडरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम, नगरसेवक राजेंद्र गिलबिले, माजी सरपंच अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, भाजपाचे भागवत आवटे, नगरसेवक डी. डी. भोसले, रमेश गोगावले आदी उपस्थित होते.

या वृक्षांच्या लागवडीनंतर संगोपन करण्यासाठी गावपातळीवरच्या हद्दीतील वृक्ष दत्तक देवून किमान १० लोकांचे पथक कार्यरत राहील. त्यामुळे हा पालखी मार्ग भविष्यात निश्चितच ‘हरित मार्ग’ होईल, मात्र त्यासाठी लोकसहभाग नितांत गरजेचा आहे.
- माधव जगताप,
माऊली हरित अभियान, प्रमुख

Web Title: Palkhi route will be 'Green Road'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.