लोकमत न्यूज नेटवर्क, देहूगाव: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४० वा पालखी सोहळा १८ जून रोजी श्री श्रेत्र देहूगाव येथून दुपारी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १८ जुनला सुरू होणार असून हा सोहळा ६ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल. येथे पालखी सोहळा ६ जुलै ते ते १० जुलै २०२५ अखेर मुक्कामी असणार आहे. हा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द केला आहे. यंदा पालखी लोणी काळभोरपासून पुढे गेल्यानंतर दुपारच्या १ तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौकात थांबणार आहे. हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून, ३५ व्या दिवशी २१ जुलैला देहूत दाखल होणार आहे. पत्रकार परिषदेस पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
- पालखीचे प्रस्थान बुधवार दि. १८ जुन रोजी होणार असून पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल. गुरूवार दि. १९ जुन रोजी पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ थांबेल तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी थांबेल.
- शुक्रवारी पालखी पुण्यात नानपेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल, शनिवारी पालखी याच मंदिरात मुक्कामी असेल. रविवारी पालखी पुण्यातून लोणी काळभोर कदम वाकवस्ती पालखीतळाकडे रवाना होईल व येथेच पालखी नव्या पालखी तळावर मुक्कामी राहिली. सोमवारी यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल. मंगळवारी रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
- २५ जुनला पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी असेल. २६ जुनला पालखी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगमात मुक्कामी असेल. २७ जुनला सणसर येथे मुक्कामी असेल. २८ जुनला पालखी सणसर मधुल पहाटे निघेल व वाटेत बेलवडी येथे पहिले (गोल रिंगण) करेल व पालखी रात्री निमगाव केतकी येथे पालखी तळावर मुक्कामासाठी जाईल. २९ जुनला पालखीचे इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल व रात्री पालखी इंदापूर येथे मुक्कामी असेल, ३० जुनला पालखी सराटी येथे मुक्कामी असेल.
- १ जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालुन पुढे पालखी अकलुज कडे मार्गस्थ होईल व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पुर्ण करेल. त्यानंतर पालखी अकलुजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामासाठी रवाना होईल. २ जुलैला पालखी अकलुज वरून सकाळी निघेल व दुपारी पालखी मार्गावरील माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहिल. ३ जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल.
- ४ जुलैला पालखीचे सायंकाळी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण पार पाडेल व त्यानंतर पालखी वाखरी येथील पालखी तळावर मुक्कामी राहिल. ५ जुलै रोजी पालखी सकाळी वाखरी येथून पंढरपूर कडे रवाना होईल व सायंकाळी पादुका आरतीस्थळी पालखी सोहळ्यातील शेवटचे व तिसरे उभे रिंगण पार पडेल. त्यानतंर पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री पालखी येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल. येथे पालखी रविवारी ६ जुलै ते गुरूवार १० जुलैअखेर मुक्कामी असेल.
- १० जुलैला पालखी सोहळा दुपार नंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरवात करेल. हा १२ दिवसांचा परतीचा प्रवास संपवून हा सोहळा श्री क्षेत्र देहूगाव येथे २१ जुलैला दुपारी पोहोचेल व येथे मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल.
- यंदा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने आंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. जर तिथी वाढली असती तर इंदापूरला दोन मुक्काम झाले असते अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
लोणी काळभोर वरून पालखी सोहळा निघाल्यानंतर उरुळी कांचन मार्गे पुढे जात असतो. हा पालखी सोहळा पुर्वी पासुन गावातून जात असे. सध्या पालखी सोहळा गावातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागतात. याचा विचार करून व गत वर्षी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार यंदा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंती अर्जानुसार पालखी सोहळा दुपारच्या एक तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील पीडीसीसी बॅकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले.
भाविकांची सोय व्हावी, दिंडी चालकांना मुक्कामाच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचता यावे यासाठी शहरी भागात सायंकाळी ८ वाजता समाज आरती घेण्यात येणार असून त्यानंतर लगेच किर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले.