पादुकांचे दर्शन; धन्य झाले मन
By Admin | Updated: June 22, 2014 23:48 IST2014-06-22T23:48:13+5:302014-06-22T23:48:13+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणेकर सुखावले. रविवारची सुटी असल्याने पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जनसागर लोटला.

पादुकांचे दर्शन; धन्य झाले मन
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणेकर सुखावले. रविवारची सुटी असल्याने पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जनसागर लोटला. ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’चा एकच आवाज सर्वत्र दुमदुमत होता. शहरात विविध ठिकाणी पुणेकरांनी वारकऱ्यांच्या सेवेकरिता विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पहाटेपासूनच पुणेकरांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. पोलिसांनी ठिकठिकाणी मदत केंद्र आणि बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक सुरळीत चालू होती. माऊलींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याचे भाव
प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये होती. तुकोबारायांच्या नावाचा गजर करीत भाविकांनी फुलांनी सजविलेल्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. मंदिराबाहेर सीसीटीव्हीची पाहणी करीत पोलीस कोणतीही विपरीत घटना घडू नये, याकरिता सतर्क होते. राहुट्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात अभंगाचे सूर ऐकू
येत होते. (प्रतिनिधी)