पुणे : पुण्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला असून, मिनिटाला १८० लिटर ऑक्सिजनची निर्माण करण्याची याची क्षमता आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या हस्ते प्लान्टचे उद्घाटन झाले असून, या वेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने आपल्या सर्व विभागातील विभागीय रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरू केला आहे. यात पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई येथील हॉस्पिटलचा समावेश आहे. भुसावळमध्ये या पूर्वीच ऑक्सिजन प्लान्ट सुरू झाला. पुण्यात प्लान्ट सुरू करण्यासाठी किमान ४५ लाख रुपयांचा खर्च झाला. रेल्वे हॉस्पिटलमध्ये या प्लान्टसाठी जनरेटरची देखील सोय करण्यात आली आहे. शिवाय, आता ऑक्सिजन बेडची देखील पुरेसी संख्या आहे.
रेल्वे बोर्डने देशात 86 ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरू केले आहे. तसेच यासाठी सरव्यवस्थापकांना २ कोटी रुपयांचे अधिकार दिले होते. यावेळी मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. संजय आठवले, वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक विनोद मीना, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्य्वस्थापक नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय, डॉ. अविनाश निकालजे, डॉ. अभय कुमार मिश्रा, डॉ. नीति आहुजा, डॉ. नवीन कुमार यादव आदी उपस्थित होते.