आमच्याच नेत्यांनी आणली मेट्रो!
By Admin | Updated: September 11, 2015 04:54 IST2015-09-11T04:54:31+5:302015-09-11T04:54:31+5:30
गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोच्या आराखड्यास बुधवारी दिल्लीतील बैठकीत मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत मेट्रो

आमच्याच नेत्यांनी आणली मेट्रो!
पुणे : गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोच्या आराखड्यास बुधवारी दिल्लीतील बैठकीत मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत मेट्रो आमच्याच पक्षाने व आदरणीय नेत्यांनी आणल्याचे मोठमोठे दावे करून सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी भाषणे केली. त्याचबरोबर कुरघोडीचे राजकारण करीत एकमेकांच्या नेत्यांवर टीका करताना सभागृहाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्याचे भानही नगसेवकांना राहिले नाही.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा होती. सभेला सुरूवात झाल्यानंतर शहरातील मेट्रोसह, रिंग रोड, चांदणी चौकातील उड्डाणपूल, विमानतळ या
प्रश्नांची सोडवणूक झाल्याबद्दल सर्वच पक्षांकडून अभिनंदनपर
भाषणे करण्यात आली.
या बैठकीला काँग्रेस व मनसेच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल त्यांच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असता, त्यामध्येही काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख न करण्यात आल्याबद्दल गटनेते अरविंद शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना पुण्यात मेट्रो योजना आणण्यात आली, तसेच काँग्रेसचे तत्कालीन नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेऊन त्याला गती दिली. त्या वेळी मेट्रोला विरोध करणारे आता आम्हीच मेट्रो आणल्याची भाषणे करीत असल्याची टीका अरविंद शिंदे यांनी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
सभागृह भान ठेवून वागणार आहे का?
विवेकवादी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात येत असताना कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी त्यामध्ये केंद्राच्या अभिनंदनाचा ठराव घुसडविण्याच्या प्रकारावर रिपब्लिकन पक्षाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली.
श्रेयाचे राजकारण घेण्याच्या नादात आपण काय करीत आहोत याचे भान सभागृह ठेवणार आहे की नाही असा उद्विग्न सवाल धेंडे यांनी केला.
शरद पवार यांच्यामुळे मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला आहे. सत्तेत नसतानाही कशी कामे करून घ्यायची हे पवार यांच्याकडून शिकले पाहिजे.’’
- बंडू केमसे, सभागृह नेते
कॉँग्रेसने मेट्रोची सुरूवात केली आहे, मेट्रो प्रकल्प मार्गी लागल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूनच त्याचे उद्घाटन केले जाईल.’’
- आबा बागूल,
उपमहापौर
यंदा महापालिकेमध्ये मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले, म्हणूनच मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला.’’
- राजेंद्र वागस्कर,
मनसे
पुण्यामध्ये मेट्रो हा पहिला शब्द सुरेश कलमाडी यांनी उच्चारला. त्यांचे स्वप्न होते पुण्यामध्ये मेट्रो सुरू करायची. मेट्रो प्रकल्पाचे श्रेय त्यांनाही दिले पाहिजे.’’
- सुनंदा गडाळे