संघटना बांधणी आवश्यक
By Admin | Updated: August 11, 2014 03:44 IST2014-08-11T03:44:43+5:302014-08-11T03:44:43+5:30
पक्षाची संघटना बांधणी व्यवस्थित नाही़ माहिती मिळत नाही़ कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज निरीक्षकांपुढे केल्या़

संघटना बांधणी आवश्यक
पुणे : पक्षाची संघटना बांधणी व्यवस्थित नाही़ माहिती मिळत नाही़ कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज निरीक्षकांपुढे केल्या़ विधानसभेसाठी मनसेचे निरीक्षक विधानसभेचे गटनेते बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, रिटा गुप्ता यांनी पुणे शहरातील ८ मतदारसंघांतील ४७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ या वेळी त्यांनी संघटनेमधील खटकणाऱ्या बाबी या निरीक्षकांपुढे व्यक्त केल्या़
मनसे इच्छुकांच्या मुलाखती आज असल्या तरी, बऱ्याच जणांना काल सायंकाळपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती कधी आहेत, याची माहिती नव्हती़ नियोजनाप्रमाणे सुरुवातीला पिंपरीतील मुलाखती होणार होत्या. पण, त्यात बदल करून प्रथम पुणे शहरातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या सर्वांना एकाचवेळी बोलविण्यात आले़ खडकवासला मतदारसंघात सर्वाधिक १० इच्छुक असून, कसबा आणि कँटोन्मेंटमध्ये प्रत्येकी तिघे इच्छुक आहेत़ शिवाजीनगरमध्ये ४ जण इच्छुक आहेत़ निरीक्षकांनी त्यांना तुम्ही आपसांत एकमत करून एक नाव सुचवा, असे सांगितले़ पण, दोन्ही ठिकाणी एकमत न झाल्याने शेवटी आता आम्ही ठरवू, असे त्यांनी सांगितले़ आज सकाळपासूनच मनसेच्या इच्छुकांनी नारायण पेठेतील मनसे कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले़ खडकवासला, वडगाव शेरी, हडपसर इच्छुकांच्या समर्थकांची जास्त गर्दी होती़ सायंकाळी कोथरूड मधील इच्छुकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला़(प्रतिनिधी)