रुग्णांची यादी तयार करण्याचे आदेश
By Admin | Updated: March 17, 2015 00:17 IST2015-03-17T00:17:29+5:302015-03-17T00:17:29+5:30
खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या आणि घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची यादी तयार करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे.

रुग्णांची यादी तयार करण्याचे आदेश
पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या आणि घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची यादी तयार करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे. त्यानुसार पुण्यातून ५८ रुग्णांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित रुग्णांसह मृत रुग्णांच्या नातेवाइकांना परतावा देण्यात येणार आहे.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत गोंधळ सुरू होता. अंमलबजावणीची सुरूवात करण्याअगोदर रुग्णांची यादी तयार असावी, यासाठी राज्यातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये दोन मार्चपासून स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांचा खर्च सरकार उचलणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी मृत अथवा उपचारानंतर बरे होऊन गेलेल्या रुग्णांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, की औंध जिल्हा रुग्णालयाने पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची व मृत रुग्णांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये ५८ जणांची नावे आहेत. त्यात पुण्यातून ४३ जणांचा, तर पिंपरीतील १५ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे म्हणाले, की पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची यादी तयार केली असून, ती आरोग्य संचालकांना पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)