आंबेगाव तालुक्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:12+5:302021-07-23T04:09:12+5:30
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. बुधवारी रात्रीतर या भागात ्रढगफुटी सदृश्य पाऊस झाला. ...

आंबेगाव तालुक्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. बुधवारी रात्रीतर या भागात ्रढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे गोहे, मघोली, पोखरी, जांभोरी कुशिरे, पाटण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. अनेक गावांत लोकवस्तीत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पोखरी घाटात दरड कोसळल्याने भीमाशंकर परीसराचा संपर्क तुटला. तर काळवाडी,मेघोली रस्त्यावर तसेच कुशिरे पाटण रस्त्यावरही दरडी कोसळून आदिवासी भागाचा संपर्क तुटला. गोहे, डिंभे, फुलवडे, माळीण, बोरघर या भागातही अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने गुरूवारी सकाळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, पंचायत समिती सदस्या इंदुताई लोहकरे, बाजार समितीचे माजी संचालक मारूती केंगले, प्रदिप आमोंडकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, घोडेगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे यांनी घटनास्थळी धाव घेवून परीस्थितीचा आढावा घेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्या त्या विभागाला दिले आहेत.
कोट
आदिवासी भागात झालेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या आदेशानुसार बाधित शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे केले जात असून हा अहवाल लवकरात लवकर शासणाला सादर केला जाणार आहे
- संजय गवारी सभापती पंचायत समिती आंबेगांव
फोटो : आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्याती पदाधिकारी व प्रशासणातील अधिकारी सध्या आदिवासी भागातील मदत कार्य व पंचनामे करण्याच्या कामांत गुंतले आहेत.(छायाचित्र-कांताराम भवारी)