औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्याचे आदेश
By Admin | Updated: June 18, 2015 23:27 IST2015-06-18T23:27:11+5:302015-06-18T23:27:11+5:30
तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, करडे, बाभूळसर-खुर्द या चार गावांतील ८१० हेक्टर क्षेत्रावरील औद्योगिकीकरणाचे

औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्याचे आदेश
शिरूर : तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, करडे, बाभूळसर-खुर्द या चार गावांतील ८१० हेक्टर क्षेत्रावरील औद्योगिकीकरणाचे शेरे काढण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय असून, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती, कारेगाव, करडे व बाभुळसर खुर्द या चार गावांतील जमिनींवर एमआयडीसीचे शेरे पडले होते. हे शेरे काढून घ्यावेत, यासाठी संबंधित गावांच्या शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व आमदार पाचर्णे यांना विनंती केली होती. याबाबत पाटील व पाचर्णे यांनी उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मार्च महिन्यात रांजणगाव गणपती येथे उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला संबोधित करताना देसाई यांनी तीन महिन्यांत जमिनीवरील शेरे काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.
या अनुषंगाने खासदार पाटील व आमदार पाचर्णे यांनी काल (दि.१७) उद्योगमंत्री देसाई यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना शेरे काढण्यासंदर्भात विनंतीपत्र दिले. यावर देसाई यांनी त्वरित निर्णय घेऊन शेरे काढण्यासंदर्भात नोटिफिकेशनवर स्वाक्षरी केली.
नोटिफिकेशनबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती पाठवल्यांनतर जिल्हाधिकारी पुढची प्रक्रिया पार पाडतील.
सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दिलेले वचन पूर्ण केल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. या वचनपूर्ती निमित्त रांजणगाव गणपती येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही पाचर्णे यांनी सांगितले. (वार्ताहर)