पालखी सोहळ्यापूर्वी देहूतील कामे पूर्ण करण्याचे आदेश
By Admin | Updated: July 1, 2015 23:47 IST2015-07-01T23:47:31+5:302015-07-01T23:47:31+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील विकासकामांची पाहणी बुधवारी विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी केली.

पालखी सोहळ्यापूर्वी देहूतील कामे पूर्ण करण्याचे आदेश
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील विकासकामांची पाहणी बुधवारी विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी केली. जी कामे तातडीने करता येतील, ती कामे पालखी सोहळ्यापूर्वी करून घेण्याचे आदेश दिले असून, उर्वरित कामे पालखी सोहळ्यानंतर सुरू करून त्या कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार असल्याने पालखीची तयारीची पाहणी करण्याबरोबरच तीर्थक्षेत्र विकासकामांर्तगत सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्तांनी पाहणी केली. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व आरक्षित शेतजमिनीचा मोबदला १५ जुलैपर्यंत किमान ५० टक्के लोकांना तरी वाटप करावेत, असे संबंधितांना त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.
श्री संत तुकाराममहाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन संस्थानच्या अडचणी समजावून घेत मंदिर परिसरातील संत नारायणमहाराज समाधी मंदिराकडे व इंद्रायणी नदीकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर दगडी फरशी बसविण्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, पालखी मार्गावरील पहिल्या मुक्कामाच्या इनामदार वाड्यापुढील काम तातडीने उरकण्यात यावे, या ठिकाणचा व पंढरपूर येथील शेवटच्या मुक्कामाची जागा असलेला संत तुकाराममहाराज मठदेखील पालखी तळ म्हणून विकास करण्यात यावा, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली.
(वार्ताहर)