मतदान केंद्रांची व्यवस्था लावण्याचे आदेश
By Admin | Updated: February 12, 2017 04:55 IST2017-02-12T04:55:05+5:302017-02-12T04:55:05+5:30
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राची अंतर्गत रचना, मतदारांसाठी सुविधा आदींची काटेकोरपणे व्यवस्था लावण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.

मतदान केंद्रांची व्यवस्था लावण्याचे आदेश
पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राची अंतर्गत रचना, मतदारांसाठी सुविधा आदींची काटेकोरपणे व्यवस्था लावण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.
निवडणुकीतील मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांच्या व्यवस्थेचा आढावा कुणाल कुमार यांनी घेतला. मतदान केंद्राची रचना आदर्श असावी, मतदान केंद्राचे अंतर अधिक लांब असता कामा नये, मतदान केंद्रे शक्यतो तळमजल्यावर असावे, अपवादात्मक परिस्थितीत पहिल्या मजल्यावर असल्यास मतदारांची गैरसोय होणार नाही. तसेच, अंध, अपंग अशा व्यक्तींना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था असावी, अशा सूचना कुणाल कुमार यांनी दिल्या. मतदान केंद्राबाहेर प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे फलक लावण्यात यावेत. आवश्यक मतदार याद्या, छपाई स्टेशनरी, साहित्य पुरवठा व आवश्यक कर्मचारी यांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना कुणाल कुमार यांनी दिल्या.
मतदानानिमित्त जनजागृती
महापालिका निवडणुकीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी पुणे मनपाच्या श्रमिक कला पथकाच्या वतीने शिवाजीनगर एसटी स्थानक व रेल्वेस्थानक, डेक्कन पीएमपीएल परिसर, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, मॉर्डन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंध ब्रेमन चौक या परिसरात मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच, माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीच्या कार्यक्रमातही माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.मतदान जनजागृती अभियानांतर्गत मॉडर्न महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.