बांधकाम विभागावर कारवाईचे आदेश

By Admin | Updated: June 21, 2016 00:21 IST2016-06-21T00:21:58+5:302016-06-21T00:21:58+5:30

महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी नियमबाह्य कामे सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालतात

Order for action on the construction department | बांधकाम विभागावर कारवाईचे आदेश

बांधकाम विभागावर कारवाईचे आदेश

पिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी नियमबाह्य कामे सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालतात. या लोकमतने केलेल्या फाइल मंजुरीसाठी ‘रात्रीस खेळ चाले’ या स्टिंग आॅपरेशनचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी वादळी चर्चा झाली. बांधकाम विभागाच्या सायंकाळी उशिरापर्यंत चालणाऱ्या
कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी दिले.
महापालिकेतील नगगरचना व बांधकाम परवाना विभागात रोजच दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी अधिक लगबग असते. सामान्य नागरिकांऐवजी बिल्डरांचीच जास्त बडदास्त राखली जाते. नियमानुसार जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशी कामे दिवस मावळल्यानंतर अर्थपूर्ण व्यवहार करून उरकली जातात. इतर विभागांचे कामकाज सहाला संपत असताना नगररचना आणि बांधकाम परवाना विभागाचे कामकाज सुरू होेते. हे दोन विभाग मलई देणारे असल्याने येथे पोस्टिंगसाठी अधिकारी अडीच लाख देण्याची तयारी ठेवतात, आदी मुद्दे सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केले. यासह रात्रीच्या वेळी अधिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ओव्हरटाइम देऊन त्यांचा सत्कार करावा, अशी उपरोधिक टीकाही करण्यात आली.
शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी सभागृहात ‘लोकमत’ झळकावीत या दोन विभागांच्या कारभाराबाबत प्रशासनाला धारेवर धरले. रात्री उशिरापर्यंत थांबून बेकायदा फायली मंजुरीच्या कारभाराबाबतची गंभीर दखल घ्यायला हवी. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिरापर्यंत का थांबतात? त्यांचा नेमका काय उद्देश असतो? या गोष्टी स्पष्ट
व्हायला हव्यात. या विभागात उशिरापर्यंत चालणाऱ्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी उबाळे यांनी केली.
नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या की, लोकमतने या विभागातील कार्यालय बंद झाल्यानंतरचा कारभार स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आणला आहे. सायंकाळी सहानंतर अधिकारी, कर्मचारी काय करतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. यासह दिवसभरात कामकाज उरकणे शक्य असतानाही रात्री उशिरापर्यंत थांबण्याची काय आवश्यकता आहे? दोन्ही विभागांची कार्यालये वेळेत बंद व्हावीत, असे आदेश द्यावेत.(प्रतिनिधी)

‘त्यांची’ ड्रेनेज विभागात बदली करा!
रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करायला हवा, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे उल्हास शेट्टी यांनी केली. सामान्य नागरिकांपेक्षाही बिल्डरांची कामे करण्यास येथील अधिकारी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. आर. एस. कुमार म्हणाले, या विभागात पोस्टिंग मिळण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये मोजले जातात. बदली झाली, तरी काही अधिकारी पुन्हा येथे येण्यासाठी आग्रही असतात. वर्षानुवर्षे येथेच काम करणाऱ्यांना पाणीपुरवठा, ड्रेनेज या विभागांत टाकायला हवे.
काँगे्रसचे भाऊसाहेब भोईर यांनी या प्रकरणावरून अधिकाऱ्यांवर उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, ‘‘या विभागातील अधिकारी वेळेपेक्षाही अधिक काम करतात. त्यांना या कामाचा ‘ओव्हरटाइम’ द्यायला हवा. यासह त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा ताण पाहता त्यांचा जाहीर सत्कार करावा.’’ या प्रकरणावरून सभागृहातील नगरसेवक गंभीर झाल्याने महापौर शकुंतला धराडे यांनी या दोन्ही विभागांतील कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

‘लोकमत’ झळकवला
बांधकाम परवाना व नगररचना विभागातील कारभाराबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्ताची नगरसेवकांनी गंभीर दखल घेत या वृत्ताचे सभागृहात सविस्तर वाचन करून अशा कारभारामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी गटनेत्या सुलभा उबाळे, सीमा सावळे व भाऊसाहेब भोईर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

Web Title: Order for action on the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.