१६ आणि १७ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:24+5:302021-05-14T04:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्षद्विप परिसरात गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ...

१६ आणि १७ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्षद्विप परिसरात गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे १६ मे रोजी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मार्ग लक्षात घेता ते १८ मे रोजी अथवा त्यानंतर गुजरात व पाकिस्तानच्या किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे गुजरातसह कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाने १६ व १७ मे रोजी ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आग्नेय अरबी समुद्रात गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सध्याचा त्याचा मार्ग लक्षात घेता ते १८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. लक्षद्विप बेटसमूह, केरळ या परिसरात १४ व १५ मे रोजी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील घाट परिसर, कर्नाटक किनारपट्टी भागात १४ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गोवा व दक्षिण कोकणात १५ मे रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १६ व १७ मे रोजी कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ भागात १८ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता असून त्याला जोडून असलेल्या दक्षिण-पश्चिम राजस्थानातही १९ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट भागात १६ व १७ मे रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे जिल्ह्यात १७ मे रोजी ऑरेंज अलर्ट
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १७ मे रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, येथेही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. घाट परिसरात राहणारे व त्या भागातील जाणार्यांनी सतर्क रहावे, असा इशारा दिला आहे. विदर्भातही १६ व १७ मे रोजी काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.