जीवघेण्या दुभाजकांना मिळणार पर्याय
By Admin | Updated: May 9, 2017 04:13 IST2017-05-09T04:13:32+5:302017-05-09T04:13:32+5:30
सिमेंट काँक्रिट रस्त्यावर दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघातामधील जीवितहानी टाळण्यासाठी थर्माकोल, रबर व अन्य घटकांचा

जीवघेण्या दुभाजकांना मिळणार पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिमेंट काँक्रिट रस्त्यावर दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघातामधील जीवितहानी टाळण्यासाठी थर्माकोल, रबर व अन्य घटकांचा वापर करून दुभाजकाची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात वाहनांचे टायर फुटू नयेत, म्हणून सेन्सरची निर्मिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘फॉल डिटेक्शन जीपीएस ट्रॅकर,’ पर्यावरणात्मक कूकस्टोव्ह अशा ७ उपयुक्त संशोधन भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे.
प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी या संशोधनांची माहिती दिली. या वेळी या संशोधनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. प्रा. सचिन चव्हाण व विद्यार्थ्यांनी या ‘कंपोझिट रोड डिव्हायडर’ची निर्मिती केली आहे. या दुभाजकाची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा. आर. बी. घोंगडे यांनी ‘टायर टेंपरेचर मॉनिटरिंग सिस्टिम निर्माण केली आहे. वाहनांचा वेग वाढल्याने टायरचे तापमान वाढते. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याची संख्या जास्त आहे. टायरचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी नवे सेन्सर विकसित केले आहे. हे सेन्सर टायरजवळ लावण्यात येणार आहे. त्यामुळे टायरच्या तापमानाची माहिती स्मार्टफोनद्वारे वाहनचालकाला मिळू शकणार आहे. मेकॅनिकल शाखेचे प्रा. प्रदीप जाधव यांनी अल्ट्रासॉनिक असिस्टेड इलेक्ट्रोकेमिकल मशिनिंग विथ रोटेटिंग इलेक्ट्रोड ही संशोधन प्रणाली विकसित केली आहे.