पिंपरी सांडस येथे कचरा डेपोला विरोध
By Admin | Updated: September 13, 2014 05:25 IST2014-09-13T05:25:54+5:302014-09-13T05:25:54+5:30
येथील कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी सांडस येथे कचरा डेपोला विरोध
पिंपरी सांडस : येथील कचरा डेपोला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी सांडस येथील जागेची मागणी महानगरपालिका वनविभागाकडे करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर या वनविभागाच्या जागेमध्ये कचरा डेपो होऊ नये, म्हणून सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या जागेवर महानगरपालिका कचरा डेपो करू इच्छित आहे. त्या ठिकाणी वन विभागाने लाखो रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या माध्यमातून बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आहे. याशिवाय खार प्रकारच्या वृक्षाची लागवड केली आहे. या सर्व गोष्टींचे नुकसान होऊ नये म्हणून पिंपरी सांडस ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरपंच सुवर्णा गजरे, उपसरपंच दत्तात्रय सातव, ग्रामसेवक एन. पी. चव्हाण, कार्याध्यक्ष दत्तात्रय भोरडे, संपत भोरडे, ग्रा. पं सदस्य मंदा भोरडे, सखुबाई ढेकळे, ताई ठोंबरे, रामभाऊ शिंगटे, मा. सरपंच शंकर मांडे, भगवान भोरडे, सतीश भोरडे, सुनील भोरडे, पांडुरंग गजरे, सोमनाथ भोरडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)